
नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर यांचा सत्कार ; ‘मानवतेचा संदेश आत्मसात करा‘- नगराध्यक्षांचे आवाहन
गडचिरोली : श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली शहरात तेली समाज बांधवांच्या वतीने भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात विविध सामाजिक व जनहिताचे कार्यक्रम पार पडले. श्री संत संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित या सोहळ्यातून समाज प्रबोधन आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला.
जयंतीचे मुख्य आकर्षण म्हणजे गडचिरोली शहरातून काढण्यात आलेली भव्य आणि शिस्तबद्ध मिरवणूक. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल-ताशांच्या गजरात लहान मुलींनी सादर केलेले पारंपरिक नृत्य आणि लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महिला, युवक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संतांच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते.
या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर आणि नवनियुक्त नगरसेवकांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या या सन्मानाबद्दल नगराध्यक्षांनी कृतज्ञता व्यक्त केली.
आपल्या सत्कारानंतर मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर म्हणाल्या, “संत संताजी जगनाडे महाराज यांचे समाजसुधारणेतील आणि अभंग लेखनातील योगदान अतुलनीय आहे. आजच्या धावपळीच्या युगात तरुण पिढीने शिक्षण, सेवा आणि मानवतेचा संदेश आत्मसात करणे आवश्यक आहे. समाजाच्या आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषद प्रशासन नेहमीच तत्पर राहील.”
जयंती केवळ उत्सव म्हणून न साजरी करता सामाजिक कार्याची जोड देण्यात आली. या निमित्ताने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजू रुग्णांना मदत व्हावी, या हेतूने मोठ्या संख्येने युवकांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली.
हा संपूर्ण सोहळा शांततामय आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी श्री संत जगनाडे महाराज जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समस्त तेली समाज बांधवांनी अहोरात्र परिश्रम घेतले. या सोहळ्यामुळे समाजात एकजुटीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



