गडचिरोलीविदर्भ

महिला शक्तीचा एल्गार! ; मुक्तीपथच्या साथीने सालमारा गाव झाले अवैध दारूमुक्त

गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणारे आणि निसर्गसंपदेने नटलेले सालमारा हे गाव आता खऱ्या अर्थाने ‘समृद्ध’ झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावाला लागलेली अवैध मोहाच्या दारूची कीड महिलांच्या संघटित शक्तीने आणि ‘मुक्तीपथ’ च्या मार्गदर्शनाने समूळ नष्ट केली आहे. आज हे गाव गेल्या दोन वर्षांपासून पूर्णपणे दारूविक्री मुक्त असून परिसरातील इतर गावांसाठी एक आदर्श प्रेरणास्थान बनले आहे.

सुमारे ४०० लोकसंख्या असलेल्या सालमारा गावाच्या तिन्ही बाजूंना घनदाट जंगल आणि एका बाजूस नयनरम्य तलाव आहे. मात्र, याच निसर्गाचा गैरफायदा घेत काही समाजकंटकांनी जंगलात मोहाच्या दारूच्या भट्ट्या मांडल्या होत्या. गावात तब्बल १५ दारू विक्रेते सक्रिय होते. आदिवासी प्रथेच्या नावाखाली सुरू असलेल्या या व्यवसायाने रौद्र रूप धारण केले होते. केवळ गावातीलच नव्हे, तर बाहेरगावचे लोकही येथे दारू पिण्यासाठी गर्दी करत. दारूच्या वाढत्या व्यसनामुळे गावातील कौटुंबिक शांतता भंग पावली होती. घरातील पैसा दारूमध्ये जात असल्याने महिलांना मारहाण आणि लहान मुलांवर उपासमारीची वेळ आली होती. गावात दररोज होणारे तंटे-बखेडे यामुळे महिलांचे जगणे असह्य झाले होते. अखेर या अन्यायाविरुद्ध सालमारा येथील महिलांनी एकत्र येण्याचा निर्धार केला.

महिलांच्या या निर्धाराला मुक्तीपथ अभियानाची मोलाची साथ लाभली. आरमोरी तालुका संघटक विनोद कोहपरे यांनी पुढाकार घेऊन गावात महिलांचे संघटन मजबूत केले. पोलीस पाटील आणि गाव संघटनेच्या अध्यक्षा कल्पना नारनवरे यांच्या नेतृत्वात बैठकांचे सत्र सुरू झाले. केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करण्यात आला. दारू विक्रेत्यांना शपथपत्रे आणि नोटिसा देणे, गावात जनजागृती रॅली आणि मॅरेथॉनचे आयोजन, व्यसनमुक्ती उपचार शिबिरे घेणे.  गावातील महिलांच्या संघटनेने  जंगलात जाऊन दारू गाळण्याचे साहित्य आणि मोहासडवा जागीच नष्ट केला. मुक्तीपथ, पोलीस विभाग आणि महिला संघटना यांच्या संयुक्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आणि त्यांनी हा अवैध व्यवसाय बंद केला. गेल्या दोन वर्षांपासून सालमारा गावात एकही दारूची भट्टी नाही व विक्री सुद्धा बंद आहे. दारूबंदीमुळे घरातील पैसा वाचू लागला आहे, भांडणे थांबली आहेत आणि मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले जात आहे. निसर्गाच्या सानिध्यात आता दारूचा दुर्गंध नसून शांतता आणि समाधानाची झुळूक आहे.

“महिलांनी ठरवले तर त्या काय करू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सालमारा गाव आहे. मुक्तीपथच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या गावाला अवैध दारूविक्रीच्या कलंकातून मुक्त केले याचा आम्हाला अभिमान आहे.”

— कल्पना नारनवरे, अध्यक्षा, गाव संघटना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button