
काँग्रेस आणि वंचितचे आघाडीचे संकेत, मुंबईत महापौर आमच्या आघाडीचा – काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला विश्वास
नागपूर : राज्यात राजकीय वैमनस्यातून भरदिवसा खून होत आहेत. खोपोली येथील नगरसेविकेच्या नवऱ्याची भर रस्त्यात निघृण हत्या करण्यात आली. सत्ताधारी आमदार आणि मंत्री अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षाचे नाव घेऊन ही कारवाई होत नाही यावरून पोलिसांचा वापर हा फक्त सत्ता टिकवण्यासाठी केला जातोय असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
रत्नागिरी येथील हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात शिंदेसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश यांची भर रस्त्यात हत्या करण्यात आली. या प्रकरणात शिंदे सेनेचे मंत्री आणि आमदार यांनी अजित पवार यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि नेत्यांवर हत्येचे आरोप केले. थेट पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर आरोप करण्यात आले तरी तरीही कारवाई होत नाही. महायुती मधील पक्ष एकमेकांना विरोधात हत्या, मारामारी करत आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असताना पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. म्हणजे तुम्ही मुडदे पाडा, हत्या करा कारवाईच होणार नाही ही भूमिका सरकारने घेतल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
नागपूर मध्ये माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, वाशिममध्ये नकली नोटा सापडल्या. यातही भाजप निवडणूक प्रमुखांचे नाव समोर आले याबाबत पोलिसांनी फक्त तक्रार दाखल केली, पण अजूनही अटक केली जात नाही. याचा अर्थ सत्ताधारी पक्षांनी महाराष्ट्रात कितीही धुडगूस घातला तरी पोलिस थातुर मातुर कारवाई करून आरोपींना अभय देत असल्याचे वडेट्टीवर म्हणाले.
मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाची वंचित बरोबर आघाडी होत असल्याचे संकेत आहेत. याबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की वंचित बरोबर चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आमची भक्कम आघाडी ही वंचित बरोबर होईल. मुंबईत काँग्रेस आणि वंचित आघाडी एकत्र आल्यावर मुंबईत महापौर आमचाच असेल असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे दोन दिवस उरल्याने वंचित बरोबर आघाडीबाबत लवकरच चित्र स्पष्ट होईल असे सूचक संकेत वडेट्टीवार यांनी नागपुरात दिले.



