क्राईमचंद्रपूरविदर्भ

५ लाखांचे झाले ७ लाख, तरीही सावकाराचा जाच थांबेना! : ब्रह्मपुरीत अवैध सावकारकीचा हैदोस; शेतकऱ्याचा ट्रॅक्टरही हिसकावला

किडनी विक्रीच्या प्रकरणापाठोपाठ आणखी एक गंभीर तक्रार ; कोऱ्या धनादेशाचा गैरवापर करून शेतकऱ्याला न्यायालयात खेचले

ब्रह्मपुरी : नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील एका शेतकऱ्याने सावकारी जाचाला कंटाळून आपली किडनी विकण्याचा निर्णय घेतल्याची घटना ताजी असतानाच, आता अवैध सावकारकीचे आणखी एक संतापजनक प्रकरण समोर आले आहे. ५ लाख रुपयांच्या कर्जापोटी ७ लाख १० हजार रुपयांची परतफेड करूनही, सावकाराने शेतकऱ्याचा ट्रॅक्टर जप्त केला असून कोऱ्या चेकचा वापर करून खोटी केस दाखल केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील झिलबोडी येथील शेतकरी मंगेश नानाजी शेंडे यांनी आपल्या आर्थिक गरजेसाठी ३ जानेवारी २०२५ रोजी ब्रह्मपुरी येथील हार्दिक किशोर रत्नपारखी या सावकाराकडून ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज १५ टक्के व्याजदराने दिले गेले होते. जर एखादा हप्ता चुकला, तर ५ टक्के अतिरिक्त व्याजाची जाचक अट लादण्यात आली होती. कर्ज देताना सावकाराने शेतकऱ्याकडून तीन कोरे धनादेश (Blank Checks) लिहून घेतले होते.

मंगेश शेंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी आतापर्यंत मुदलापेक्षा जास्त रक्कम परत केली आहे. १७ जुलै २०२५ रोजी ३ लाख ५५ हजार रुपये रोख आणि ९५ हजार रुपये ऑनलाईन स्वरूपात दिले. ४ ऑगस्ट २०२५ रोजी हप्ते थकल्याच्या नावाखाली होणारा जाच थांबवण्यासाठी शेतकऱ्याने स्वतःचे सोने विकून २ लाख ६० हजार रुपये सावकाराला दिले. असे एकूण ७ लाख १० हजार रुपये देऊनही, सावकार अद्यापही व्याजापोटी दीड लाख रुपये शिल्लक असल्याचे सांगून धमकावत आहे.

केवळ पैशांवरच हा सावकार थांबला नाही, तर त्याने शेतकऱ्याचा ट्रॅक्टर आणि ट्रॉलीही बळजबरीने ताब्यात घेतली आहे. याशिवाय, शेतकऱ्याने दिलेला एक कोरा धनादेश मुद्दाम बँकेत टाकून तो ‘बाऊंस’ केला आणि त्याद्वारे न्यायालयात खोटी केस दाखल केली, असा गंभीर आरोप मंगेश शेंडे यांनी केला आहे. या सततच्या मानसिक छळामुळे शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

वारंवार होणाऱ्या धमक्या आणि आर्थिक शोषणाला कंटाळून मंगेश शेंडे यांनी २८ डिसेंबर रोजी पोलीस प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. ब्रह्मपुरी परिसरात अवैध सावकारांनी उच्छाद मांडला असून, अशा सावकारांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button