गडचिरोलीगोंदियाछत्तीसगडमहाराष्ट्रमुख्य बातमीमुंबईविदर्भ

६ कोटींचे बक्षीस असलेल्या कुख्यात नक्षलवादी हिडमाला अटक

ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशच्या सीमाभागात नक्षलवाद्यांना मोठा धक्का; गडचिरोली-गोंदियातही होता सक्रिय

कोरापूट : ओडिशा पोलिसांनी मोठी कारवाई करत ६ कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या कुख्यात नक्षलवादी हिडमाला (कुंजाम हिडमा उर्फ मोहन) अटक केली आहे. कोरापूट जिल्ह्यातून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशच्या सीमाभागात सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. हिडमाकडून AK-47 रायफल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

कोरापूट पोलीस आणि डिस्ट्रिक्ट वॉलंट्री फोर्स (DVF) यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. कोरापूट जिल्ह्यातील हाइपारीगुडा पोलीस ठाणे हद्दीतील पेटगुडा जंगलात हिडमाला अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, हिडमा हा महाराष्ट्रातील गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागांमध्येही नक्षली कारवायांमध्ये सक्रिय होता. त्याच्याकडून स्फोटके, AK-47 रायफल, ३५ जिवंत काडतुसे, ११७ डेटोनेटर, गनपावडर, रेडिओ, चाकू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक सखोल तपास करत आहेत.

सुरक्षा दलांकडून नक्षलवादाविरोधात सध्या मोठी मोहीम सुरू आहे आणि या कारवाईतील हे सर्वात मोठे यश मानले जात आहे. नक्षलवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांचे ‘ऑपरेशन’ आगामी काळातही असेच सुरू राहण्याची शक्यता आहे. या ऑपरेशनमुळे नक्षलवाद्यांना मोठा फटका बसला असून, पोलिसांकडून जहाल नक्षलवाद्यांचा जंगलात शोध घेऊन खात्मा केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात हिडमासारख्या आणखी अनेक कुख्यात नक्षलवाद्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button