
महानाम यज्ञ महोत्सवाचे औचित्य; समाजसेविका उषा मंडल यांचा नागरिकांसाठी स्तुत्य उपक्रम
गडचिरोली : धार्मिक उत्सवाच्या सोबतीला सामाजिक सेवेची जोड देत, मूलचेरा तालुक्यातील गांधीनगर येथे आरोग्याची मोठी पर्वणी लाभणार आहे. महानाम यज्ञ महोत्सवाच्या पावन निमित्ताने, ग्रामीण भागातील नागरिकांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन रविवार, ४ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजता जि.प. बंगला, हिंदी उच्च प्राथमिक केंद्र विद्यालय, गांधीनगर येथे करण्यात आले आहे. समाजसेविका उषा निरंजन मंडल यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या उपक्रमामुळे दुर्गम भागातील शेकडो नागरिकांना नवी दृष्टी मिळणार आहे.
ग्रामीण भागात डोळ्यांच्या अद्ययावत तपासणीची सोय उपलब्ध नसल्याने अनेक नागरिक दृष्टीदोषाकडे दुर्लक्ष करतात. ही गरज ओळखून या शिबिरात ‘आरोग्यम हेल्थ केअर, नागपूर’ येथील अनुभवी आणि तज्ज्ञ नेत्ररोग तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. तपासणीअंती ज्या नागरिकांना गरज आहे, त्यांना चष्मे आणि आवश्यक औषधे पूर्णपणे मोफत दिली जाणार आहेत.
हा भव्य सामाजिक उपक्रम उषा निरंजन मंडल यांच्या नेतृत्वात राबवला जात असून, त्यांना राखी गोरंग मंडल व गोरंग गोपाल मंडल यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. महानाम यज्ञाच्या निमित्ताने आयोजित या आरोग्य शिबिरातून भक्तीसोबतच जनसेवेचा आदर्श घालून देण्यात आला आहे.
“आरोग्य हीच खरी संपत्ती आहे,” हा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी हे शिबिर आयोजित केले आहे. गांधीनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या उपक्रमामुळे मूलचेरा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, परिसरातून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.



