
पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक ; पोलिसांनी उध्वस्त केली हातभट्टी
वर्धा : नाल्यातील गलिच्छ पाण्याचा वापर करून गावठी दारूची निर्मिती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईतून उघड झाला आहे. ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धोत्रा शिवारात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी एकूण ५ लाख ९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
धोत्रा शिवारात नाल्याच्या काठावर गावठी दारू गाळून ती परिसरात चढ्या दराने विकली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरात छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी प्रफुल्ल विक्रम कांबळे, गजानन रामचंद्र कोपरकर आणि यश गंगाधर वानखेडे (रा. तळेगाव टा.) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरून ४ हजार ४०० लीटर मोह रसायन सडवा, १६८ लीटर तयार गावठी दारू, २३ ड्रम, गूळ व इतर साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई अरविंद येनूरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित व अभिषेक नाईक यांच्या पथकाने केली.



