आरोग्यगडचिरोलीविदर्भ

कोटगुल येथे विशेष ‘कर्करोग तपासणी’ शिबिर ; ८२ नागरिकांची मोफत तपासणी

आरोग्य विभागाची हायटेक कर्करोग तपासणी व्हॅन कोटगुलमध्ये दाखल ; १ संशयित रुग्ण आढळला

कोरची : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘विशेष कर्करोग तपासणी मोहिमे’ने आता दुर्गम भागातील नागरिकांच्या दारापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवली आहे. याच मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल (ता. कोरची) येथे आयोजित शिबिरात परिसरातील ८२ नागरिकांची सखोल तपासणी करण्यात आली.

अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असलेल्या कर्करोग तपासणी व्हॅनच्या माध्यमातून ही मोहीम राबवली गेली. यामध्ये प्रामुख्याने मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगाची तपासणी करण्यात आली. मुख कर्करोग: एकूण ६३ नागरिकांची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये १ संशयित रुग्ण आढळला आहे. स्तन कर्करोग: १९ महिलांची तपासणी झाली, यात कोणताही संशयित रुग्ण आढळला नाही. गर्भाशय मुख कर्करोग: १७ महिलांची VIA पद्धतीने तपासणी करण्यात आली.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम संपूर्ण राज्यात सुरू आहे. गडचिरोलीत मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वीरीत्या राबविली जात आहे. कोरची तालुक्यात वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिष विटणकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी यांनी शिबिराचे नेटके नियोजन केले.

तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणीसोबतच नागरिकांचे समुपदेशनही केले. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे धोके आणि कर्करोगाची प्राथमिक लक्षणे ओळखून वेळेत उपचार घेण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. डॉ. मारगिया आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. दुधे यांनी तांत्रिक तपासणीची जबाबदारी सांभाळली. याकामी प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुलचे डॉ. स्वप्निल चोरुडे, डॉ. हलमी आणि ग्रामीण रुग्णालय कोरचीच्या चमूने मोलाचे सहकार्य केले.

कर्करोग हा असाध्य आजार नाही, जर त्याचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाले तर त्यावर यशस्वी उपचार शक्य आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि संशयास्पद लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असा संदेश या शिबिरातून देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button