
एकूण ५३१ प्रकरणे निकाली, कौटुंबिक वादासह अनेक प्रकरणांवर तोडगा
गडचिरोली : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये १३ सप्टेंबर २०२५ रोजी तिसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीच्या माध्यमातून १ कोटी ६६ लाख ३७ हजार ४५२ रुपयांची एकूण वसुली झाली, ज्यामुळे अनेक वाद आपसांत मिटले.
या लोकअदालतीमध्ये एकूण ९ पॅनल कार्यरत होते. या पॅनलसमोर विविध प्रकारची ३२३ प्रलंबित प्रकरणे आणि २०८ दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये चेक बाऊन्सची प्रकरणे, कौटुंबिक वाद, मोटार वाहन अपघात दावे, बँकेची आणि वीज बिलांची थकीत कर्जे, तसेच किरकोळ फौजदारी खटल्यांचा समावेश होता. याचबरोबर, किरकोळ गुन्ह्यांच्या २६३ प्रकरणांचा निपटारा गुन्हा कबूल करून करण्यात आला.
या लोकअदालतीतील पॅनल क्रमांक २ वर एका वैवाहिक वाद प्रकरणात पती-पत्नीमध्ये समझोता झाला. त्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद रा. जोशी यांनी त्या दोघांचा सत्कार केला. यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेला त्यांचा वाद मिटला.
या लोकअदालतीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद रा. जोशी आणि सचिव अंकुश पुंडलिकराव खानोरकर यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. किशोर आखाडे, समस्त अधिवक्ता, न्यायालयीन कर्मचारी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले.



