
नागभीड : सावजाच्या मागावरअसलेल्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना कोथुळना येथे सोमवारी (दि. ५) सकाळी उघडकीस आली. मृत बिबट हा दीड वर्षाचा असून, मादी आहे.
कोथुळना येथील शेतकरी बुधा मडावी हे सोमवारी सकाळी शेताकडे जात होते. बाळकृष्ण रामटेके यांच्या शेताजवळ पोहोचल्यानंतर त्यांना दुर्गंधी आली. शेतातील कठडा नसलेल्या विहिरीत डोकावून पाहिले असता बिबट्याचा मृतदेह असल्याचे दिसले. त्यांनी लगेच सरपंच व पोलिसपाटलाच्या माध्यमातून वनविभागाला माहिती दिली. काही वेळातच वनपरिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मृत बिबट हा दोन दिवसांपूर्वी शिकारीच्या मागावर असावा. विहिरीत पडल्यानंतर बाहेर निघण्यासाठी त्याने प्रयत्न केले. मात्र अपयशी ठरला, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बगमारे यांनी दिली.
मृत बिबट्यास नागभीड येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात आणल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी ममता वानखेडे यांनी शवविच्छेदन केले. वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात दहनक्रिया करण्यात आली. उपवनसंरक्षक कुमारस्वामी व सहायक उपवनसंरक्षक महेश गायकवाड यांनी वनपरिक्षेत्र कार्यालयास भेट देऊन माहिती जाणून घेतली.



