
गुडेगाव संरक्षित वनातील अवैध उत्खननाचा पर्दाफाश; वनविभागाच्या कारवाईमुळे भूमाफियांचे धाबे दणाणले
भंडारा : पवनी प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील संरक्षित वनक्षेत्रात मुरुमाचे अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या माफियांवर वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. सावरला सहवनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गुडेगाव बीटमध्ये वनविभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.०६) छापा टाकून एक पोकलेन मशीन आणि तीन टिप्पर असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास क्षेत्रसहाय्यक आय. एच. काटेखाये आणि गुडेगावचे बिटरक्षक जी. एन. नागरगोजे हे गुडेगाव बीटमध्ये नियमित गस्तीवर होते. गस्तीदरम्यान त्यांना कक्ष क्रमांक २३८ मधील संरक्षित वनामध्ये काही हालचाल जाणवली. जवळ जाऊन पाहणी केली असता, तिथे पोकलॅन्ड मशीनच्या सहाय्याने गौण खनिजाचे (मुरुम) अवैध उत्खनन सुरू असल्याचे आणि टिप्परद्वारे त्याची वाहतूक केली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या घटनेची माहिती मिळताच पवनीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. के. नागदेवे यांनी घटनास्थळ गाठून सर्व मशिनरी जप्त केल्या. प्रसुरी क्रमांक ०३८२७/०१/२०२६ दि. ०६/०१/२०२६ नुसार भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २, ३३(१) व ५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई भंडारा उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह आणि सहायक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
जप्त केलेली वाहने वनविभागाच्या ताब्यात असून या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. के. नागदेवे करत आहेत. जंगलातील नैसर्गिक संपत्तीची लूट करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा कडक इशारा वनविभागाने दिला आहे.
वनपरिक्षेत्रातील वनालगत अवैध उत्खनन, अतिक्रमण, वृक्षतोड किंवा अवैध शिकार होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ नजीकच्या वनविभागाशी संपर्क साधावा. तसेच, वनविभागाच्या टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांक १९२६ (1926) वर २४ तास माहिती देता येईल, असे आवाहन पवनी वनविभागामार्फत करण्यात आले आहे.



