गडचिरोलीविदर्भ

कृषी विज्ञान केंद्रात ‘विकसित भारत जी राम जी’ योजनेचा जागर! ; १०० ऐवजी आता १२५ दिवस रोजगार

सोनापूर येथे दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन ; सरपंच संमेलनासह गावपातळीवर जनजागृती मोहिमेला प्रतिसाद

गडचिरोली : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथे केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘विकसित भारत जी राम जी’ योजनेचा प्रसार व प्रसिद्धी करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले. ३ आणि ४ जानेवारी रोजी आयोजित या दोन दिवसीय कार्यक्रमात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी, ३ जानेवारीला भव्य सरपंच संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी (४ जानेवारी) मौजा वाकळी, हिरापूर, कृपाळा, गुरवळा, मुडला आणि कनेरी या गावांमध्ये माहिती फलक (Banners) आणि पत्रके (Pamphlets) वाटप करून थेट गावकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन महिला व बालविकास अधिकारी श्रीमती ज्योती कडू यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, “विकसित भारत जी राम जी योजना ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देणारी योजना आहे. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आता मजुरांना वर्षाकाठी १०० ऐवजी १२५ दिवस रोजगाराची हमी मिळणार आहे. यामुळे गावपातळीवरील प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि सर्वसामान्यांना थेट आर्थिक लाभ मिळेल.”

सुचित लाकडे (विषय विशेषज्ञ, उद्यानविद्या) यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले की, जुन्या मनरेगा योजनेत विविध सुधारणा करून तिला आता ‘विकसित भारत जी राम जी’ योजना म्हणून अधिक सक्षमपणे कार्यान्वित करण्यात आले आहे. नीलिमा पाटील (विषय विशेषज्ञ, गृहविज्ञान) यांनी त्यांनी गावकऱ्यांना ग्रामसभेत उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन केले, जेणेकरून योजनेअंतर्गत जास्तीत जास्त कामे गावासाठी मंजूर करून घेता येतील. गणेश गणवीर (प्रभारी अधिकारी) यांनी फळे व भाजीपाला लागवडीतून उत्पन्न वाढवण्याचे तंत्र समजावून सांगितले. डॉ. प्रीतम चिरडे (विषय विशेषज्ञ, कृषिविद्या) यांनी विषमुक्त अन्नासाठी ‘नैसर्गिक शेती’ काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे दीपक चव्हाण, सुनिता थोटे, मोहीतकुमार गणवीर, शशिकांत सलामे, अंकुश ठाकरे तसेच ‘बायफ’ गडचिरोलीचे पदाधिकारी आणि ‘कोईतुर शेतकरी उत्पादक कंपनी’च्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या जनजागृती मोहिमेमुळे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील मजुरांना आणि शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या या नव्या योजनेची सविस्तर माहिती मिळाली असून, ग्रामीण विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button