गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीत काँग्रेसचे ‘कावड’ आंदोलन! ; आरोग्य यंत्रणेच्या दुरवस्थेवरून सरकारचा निषेध

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलेले असतानाही, जिल्ह्यातील आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. याचा निषेध करण्यासाठी बुधवारी काँग्रेसच्या वतीने गडचिरोलीतील इंदिरा गांधी चौकात भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ‘कावड अ‍ॅम्ब्युलन्स’ची प्रतिकृती सादर करून कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

नुकत्याच घडलेल्या एका दुर्दैवी घटनेचा संदर्भ देत काँग्रेसने सरकारला धारेवर धरले. जिल्ह्यात रस्त्यांच्या अभावामुळे एका गरोदर मातेला आणि तिच्या नवजात बालकाला जीव गमवावा लागला. दुर्गम भागात आजही पक्क्या रस्त्यांअभावी रुग्णांना कावडीवर टाकून मैलोन्मैल पायपीट करावी लागते. ही परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या दत्तक जिल्ह्यासाठी भूषणावह नाही, अशी टीका आंदोलकांकडून करण्यात आली.

जिल्ह्यातील रिक्त पदे भरून आरोग्य व्यवस्था तातडीने सुधारण्यात यावी. अतिदुर्गम भागांना जोडणारे रस्ते आणि पुलांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. मृत गरोदर मातेच्या कुटुंबाला न्याय देऊन योग्य आर्थिक मदत जाहीर करावी. दुर्गम गावांपर्यंत सरकारी रुग्णवाहिका पोहोचतील अशी व्यवस्था करावी. अशी मागणी काँग्रेसने या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून केली.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस नेते रामभाऊ मेश्राम, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊ वासेकर, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वडसा तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक श्रीकांत देशमुख, किसान सेलचे अध्यक्ष वामनराव सावसाकडे, पंचायत राज सेलच्या अध्यक्ष माजी जि.प.सदस्य कविता भगत, रोजगार सेलच्या कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, अनिल कोठारे, राजेश ठाकूर, शंकरराव सालोडकर, हरबाजी मोरे, अब्दुल पंजवानी, भूपेश कोलते, विनोद लेनगुरे, उत्तम ठाकरे, दिवाकर निसार, दिलीप घोडाम, महादेव भोयर, दत्तात्रय खरवडे, रतन शेंडे, श्रीकांत काथोटे, कुलदीप इंदुरकर, अमित तलांडे, नदीम नाथानी, संजय गावडे, भैय्याजी कत्रोजवार, गौरव येणप्रेड्डीवार, विपुल येलेट्टीवार, निकेश कामिडवार, कुणाल ताजने, सुधीर बांबोळे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला यावेळी उपस्थित होते.

“मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचे पालकत्व घेतले तेव्हा विकासाची मोठी स्वप्ने दाखवली होती. मात्र, आजही गरिबांना उपचारासाठी कावडीचा आधार घ्यावा लागत असेल, तर या विकासाचा अर्थ काय? जोपर्यंत आदिवासी बांधवांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.” — महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button