गडचिरोलीविदर्भ

टेंभा गावाची दारूमुक्तीकडे यशस्वी वाटचाल : 10 वर्षांपासून अवैध दारू हद्दपार

गडचिरोली : तालुक्यातील व आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या टेंभा या गावाने एकजुटीच्या जोरावर 2016 पासून गावातून अवैध दारू पूर्णपणे हद्दपार केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून ही दारूविक्रीबंदी टिकवून ठेवत या गावाने संपूर्ण जिल्ह्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

जिल्हा मुख्यालयापासून 25 किमी अंतरावर असलेल्या 1800 लोकसंख्येच्या टेंभा गावात 2015 मध्ये दारू विक्रीला उधाण आले होते. गावात 6 ते 7 विक्रेते सक्रिय झाल्यामुळे शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली होती. मद्यपींच्या गर्दीमुळे आरोग्याच्या समस्या, आर्थिक नुकसान आणि तरुणांमधील व्यसनाधीनता वाढली होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी तत्कालीन सरपंच कवडू समर्थ, माजी पोलीस पाटील दिवाकर नन्नावरे, पत्रुजी ठाकरे, अमित बानबले, मुखरू ठाकरे व गुरुदेव सेवा मंडळाने पुढाकार घेतला. गावातील अशांतता दूर करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली.

या सभेत केवळ दारूबंदीच नाही, तर रस्त्यावर गुरे बांधणे आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, तंटामुक्त समिती, बचत गट आणि युवक यांचा समावेश असलेली ‘बहुउद्देशीय समिती’ स्थापन करण्यात आली. केवळ बंदी घालून गावकरी थांबले नाहीत, तर त्यांनी ती कायम टिकवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. समितीची दरमहा बैठक घेऊन आढावा घेतला जातो. सण-उत्सव आणि निवडणुकीच्या काळात दारूची चोरटी विक्री किंवा वाटप होणार नाही, यावर ग्रामस्थांची करडी नजर असते. ‘मुक्तिपथ’ टीम वेळोवेळी गावाला भेट देऊन मार्गदर्शन करते. तसेच गावात व्यसन उपचार शिबिरे घेऊन अनेक रुग्णांना मुख्य प्रवाहात आणले आहे.

टेंभा गावाने हे सिद्ध करून दाखवले आहे की, जर ग्रामस्थांची इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर प्रशासनाच्या मदतीने कोणतेही गाव व्यसनमुक्त आणि शांत होऊ शकते. आज गावात शांतता असून युवकांचे भवितव्य सुरक्षित झाल्याचे समाधान व्यक्त होत आहे.

समितीने सलग ७ ते ८ दिवस मोहीम राबवून ४ दारू विक्रेत्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. या कडक अंमलबजावणीमुळेच आज आमचे गाव व्यसनमुक्त आहे. – ग्रामस्थ, टेंभा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button