गडचिरोलीविदर्भ

नरेंद्र उंदिरवाडे यांच्या प्रायोगिक साधनाची राज्यस्तरावर निवड

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर तसेच शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका अहेरी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, वांगेपल्ली येथे “विकसित व आत्मनिर्भर भारतासाठी STEM” या मुख्य संकल्पनेखाली ५३ वी जिल्हास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी नुकतीच अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित (STEM) या क्षेत्रातील नवकल्पना, संशोधनवृत्ती आणि शैक्षणिक नवोपक्रमांना चालना देणे, हा या प्रदर्शनीचा प्रमुख उद्देश होता.

या जिल्हास्तरीय प्रदर्शनीत गडचिरोली जिल्ह्यातील विविध शासकीय व खासगी शाळा, आश्रमशाळा तसेच निवासी शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी आणि प्रयोगशाळा सहाय्यकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. विविध गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत विज्ञान अध्यापन अधिक प्रभावी, सुलभ आणि सुरक्षित कसे करता येईल, यावर आधारित अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य व प्रायोगिक साधनांचे सादरीकरण करण्यात आले.

या स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोली येथील नरेंद्र उंदिरवाडे यांनी सादर केलेल्या ऑल इन वन’ या बहुपयोगी प्रायोगिक साधनाने परीक्षकांसह उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. प्रयोगशाळा सहाय्यक या गटामधून त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण, शास्त्रशुद्ध व प्रभावी सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या नावलौकिकात भर पडली आहे.

‘ऑल इन वन’ हे प्रायोगिक साधन शालेय स्तरावर विज्ञान विषय शिकवताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन विकसित करण्यात आले आहे. या साधनाच्या माध्यमातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच इतर विज्ञान विषयांतील विविध प्रयोग एकाच उपकरणाच्या साहाय्याने कमी वेळेत, कमी खर्चात आणि अत्यंत सुरक्षित पद्धतीने करता येतात. प्रयोग करताना लागणारी अनेक वेगवेगळी साधने, उपकरणे आणि जोडण्या या एका यंत्रणेत समाविष्ट करण्यात आल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रयोग करताना मोठी सोय होते. नरेंद्र उंदिरवाडे यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे या साधनाची कार्यपद्धती, उपयुक्तता व शैक्षणिक महत्त्व सविस्तरपणे स्पष्ट केले.

त्यांच्या या नाविन्यपूर्ण प्रयोगाची व संकल्पनेची परीक्षक मंडळाने विशेष दखल घेतली. शालेय प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनसामग्रीतही हे उपकरण अत्यंत उपयोगी ठरू शकते, तसेच विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता, निरीक्षणशक्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करेल, असे मत परीक्षकांनी व्यक्त केले. या उत्कृष्ट सादरीकरणामुळे ‘ऑल इन वन’ या प्रायोगिक साधनाची राज्यस्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनीसाठी निवड करण्यात आली आहे.

या प्रदर्शनीच्या पारितोषिक वितरण समारंभात अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दीपकदादा आत्राम हे बक्षीस वितरक म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, उपशिक्षणाधिकारी अमर गेडाम, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष मुकुंद म्हशाखेत्री तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, आकर्षक ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

नरेंद्र उंदिरवाडे यांच्या या यशाबद्दल भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था, अहेरीचे सचिव तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम, संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. राज्यस्तरावरही नरेंद्र उंदिरवाडे यांचा प्रयोग यशस्वी ठरून विद्यार्थ्यांना विज्ञान विषय अधिक रंजक आणि प्रयोगप्रधान पद्धतीने शिकण्यासाठी प्रेरणा देईल, अशी अपेक्षा यावेळी सर्वांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button