
गडचिरोली : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘अॅग्रोटेक २०२५’ या भव्य कृषी व नवसंशोधन प्रदर्शनात गोंडवाना विद्यापीठाच्या ट्रायसेफ (TRICEF) नवसंशोधन केंद्राने आपल्या नाविन्यपूर्ण उत्पादनांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या ७ स्टार्टअप्सनी ५० हजार रुपयांच्या उत्पादनांची विक्री करत व्यावसायिक यशाची मोहोर उमटवली.
ट्रायसेफ अंतर्गत कार्यरत असलेल्या १९ पैकी ७ स्टार्टअप्सनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला होता. यामध्ये प्रामुख्याने गडचिरोलीतील वनसंपदा आणि ग्रामीण कौशल्यावर आधारित उत्पादने सादर करण्यात आली:
मोहुआ सिरप व खाद्यपदार्थ: फ्रेशल अॅग्रोफॉरेस्ट्री आणि अनिशिका महिला उद्योगाचे मोहुआ आधारित पदार्थ चर्चेचा विषय ठरले. सेंद्रिय उत्पादने: गिराडकर नॅचरल अॅग्रोचे सेंद्रिय तेल, पीफोरेस्टाचा सेंद्रिय चंदन साबण आणि कंपोसोइलचे बायोचार खत. पर्यटन संकल्पना: सोबाय आणि गेला गुट्टा टुरिझमच्या माध्यमातून नाईट कॅम्पिंग, ट्रेकिंग आणि कृषी पर्यटनाचे सादरीकरण करण्यात आले.
प्रदर्शनादरम्यान ग्राहकांचा इतका मोठा प्रतिसाद मिळाला की, अनेक स्टार्टअप्सचा माल प्रदर्शनाच्या कालावधीतच संपला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी ट्रायसेफच्या स्टॉलला भेट देऊन स्टार्टअप्सच्या उपक्रमांची पाहणी केली. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या आणि नवसंशोधनातून उद्योजकता विकास करणाऱ्या या मॉडेलचे त्यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले.
या प्रदर्शनामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर सारख्या आदिवासी बहुल भागातील उद्योजकांना थेट बाजारपेठेशी संपर्क साधण्याची संधी मिळाली. शेतकऱ्यांपासून ते कृषी तज्ज्ञांपर्यंत अनेकांनी या स्टॉलला भेटी देऊन माहिती जाणून घेतली.
‘अॅग्रोटेक २०२५’ मधील हा सहभाग केवळ विक्रीपुरता मर्यादित नसून, ग्रामीण भागातील नवउद्योजकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मैलाचा दगड ठरला आहे. ट्रायसेफच्या या यशामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.



