
शिव रस्ते, ‘सर्वांसाठी घरे‘ आणि ‘लक्ष्मी मुक्ती‘ योजनांवर विशेष भर
गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा पंधरवाडा’ साजरा करण्यात येणार आहे.
या पंधरवड्यात विविध विभागांच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत. पांदण रस्ते मोहीम: या मोहिमेंतर्गत शिव रस्ते आणि पांदण रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्यांची मोजणी आणि सीमांकन केले जाईल. तसेच, रस्ता अदालत भरवून शेत रस्त्यांशी संबंधित वाद निकाली काढले जातील. ‘सर्वांसाठी घरे‘ योजना: ग्रामीण आणि शहरी भागातील पात्र लाभार्थ्यांसाठी अतिक्रमण नियमित करणे आणि घरकुलांचे पट्टे वाटप करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम: गोंदिया जिल्ह्यात काही खास उपक्रमही हाती घेतले जातील. यामध्ये ‘लक्ष्मी मुक्ती योजना‘ प्रमुख आहे, ज्यात कुटुंबातील महिलांची नावे ७/१२ उताऱ्यात भोगवटदार म्हणून समाविष्ट केली जातील. श्रावणबाळ विशेष सहाय्य योजना: या योजनेसाठी सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांच्या घरी जाऊन अर्ज स्वीकारण्याची मोहीम राबवली जाणार आहे.
जिल्हा प्रशासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या या सर्व योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी आपले प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.



