
चामोर्शी : तालुक्यातील गौरीपूर येथील प्राचीन शिवमंदिर परिसरात ‘सोमनाथ स्वाभिमान पर्वा’चे औचित्य साधून सोमवार, १२ जानेवारी रोजी भव्य शिवपूजन व अभिषेक सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता, तर वैदिक मंत्रोच्चारामुळे उपस्थित भाविकांमध्ये आध्यात्मिक ऊर्जेचा संचार झाला.
या मंगलमय प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे आणि आमदार मिलिंद नरोटे यांच्या शुभहस्ते भगवान शंकराचा विधिवत अभिषेक करण्यात आला. सोमनाथ मंदिराच्या पराक्रम आणि श्रद्धेच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करत, समाजात धार्मिक चेतना आणि सांस्कृतिक अस्मिता जागृत करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्य विद्या आभारे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजप बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, अनिल तिडके, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष निरज रामानुजनवार, नरेश अलसावार, भाविक आभारे, हरीश माकडे, शुभम बाळेकरम, अंकुश बराई, शेषराव कोहळे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, “अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता निर्माण होते. तरुण पिढीला आपल्या वैभवशाली परंपरा आणि संस्कृतीचे महत्त्व कळावे, हाच या स्वाभिमान पर्वाचा मुख्य उद्देश आहे.” या उपक्रमातून राष्ट्रीय स्वाभिमान आणि भक्तीचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
ग्रामस्थ, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. पूजेनंतर उपस्थित सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, ज्याने या भक्तिमय सोहळ्याची सांगता झाली.



