
गोंदिया : बदलते हवामान आणि वाढत्या प्रदूषणाच्या धोक्यावर मात करण्यासाठी ‘एक दिन सायकल के नाम’ हा नारा देत गोंदियातील युवकांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १ फेब्रुवारी रोजी गोंदिया ते डोंगरगड सायकल वारीचे आयोजन करण्यात आले असून, विशेष म्हणजे गोंदिया नगर परिषदेचे नगराध्यक्ष सचिन शेंडे स्वतः सायकल चालवत या वारीत सहभागी होणार आहेत.
‘संडे सायकलिंग ग्रुप’च्या वतीने २०१७ पासून सुरू झालेला हा उपक्रम आता एका मोठ्या मोहिमेचे रूप घेत आहे. यावर्षी या वारीचे सहावे वर्ष असून, १ फेब्रुवारीला सकाळी गोंदियातून ४५ ते ५० तरुण-तरुणी सायकलने छत्तीसगडमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र डोंगरगडकडे रवाना होतील. ‘मातृ-पितृ दिना’चे औचित्य साधून ही वारी आयोजित करण्यात आली आहे.
या सायकल वारीमध्ये नगराध्यक्ष सचिन शेंडे यांच्या सहभागामुळे युवकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या मोहिमेबद्दल बोलताना शेंडे यांनी सांगितले की, “ग्लोबल वॉर्मिंग आणि वाढते प्रदूषण ही आजच्या काळातील मोठी संकटे आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी सायकलिंग हा सर्वोत्तम पर्याय आहे. मी स्वतः या वारीत सहभागी होत असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी या मोहिमेत जोडावे.”
‘एक दिन सायकल के नाम’ – उपक्रमाचा उद्देश
प्रदूषण मुक्ती: वाढत्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे. निरोगी आरोग्य: दर रविवारी २० ते २५ किमी सायकल चालवून नागरिकांना व्यायामाचे महत्त्व पटवून देणे. सामाजिक संदेश: महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांत सायकलिंगद्वारे आरोग्याचा संदेश पोहोचवणे.
संडे सायकलिंग ग्रुपचे सदस्य दर रविवारी सकाळी १ ते दीड तास सायकल चालवून जनजागृती करतात. याच उपक्रमाचा भाग म्हणून डोंगरगडला जाताना वाटेत येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांनाही सायकलिंगचे फायदे सांगून ‘प्रदूषण मुक्त आणि आरोग्य संपन्न’ जीवनाचा संदेश दिला जाणार आहे. माता बम्लेश्वरीचे दर्शन घेऊन या मोहिमेची सांगता डोंगरगड येथे होईल.
सहभागी होण्यासाठी सज्ज व्हा! पर्यावरण रक्षणाच्या या महाकुंभात सहभागी होऊन आपला जिल्हा प्रदूषणमुक्त करण्यासाठी आपले योगदान द्या.



