नागपूरविदर्भ

चालू कुलरमध्ये पाणी भरताय? सावधान! ; महावितरणने जाहीर केली ‘सुरक्षा नियमावली’

घराची ‘अर्थिंग’ योग्य असणे अनिवार्य ; उन्हाळ्यात कुलर वापरताना निष्काळजीपणा न करण्याचे महावितरणचे नागरिकांना आवाहन

नागपूर : विदर्भातील उन्हाचा वाढता पारा आणि असह्य उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी सध्या घराघरांमध्ये कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. कुलरचा हा गारवा जरी सुखद वाटत असला, तरी किरकोळ निष्काळजीपणा किंवा तांत्रिक बिघाडामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. अलीकडेच नागपुरातील खरबी रोड परिसरात एका इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरचा चालू कुलरमध्ये पाणी भरताना विजेचा तीव्र धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. एका तांत्रिक क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेली ही घटना अत्यंत चटका लावून जाणारी आहे.

हाच अनर्थ टाळण्यासाठी आणि नागरिकांचा उन्हाळा सुरक्षित व निर्धास्त जावा, यासाठी महावितरणने काही सोपे आणि अत्यंत महत्त्वाचे सुरक्षेचे नियम व मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, जर कुलरच्या अंतर्गत वायर्समध्ये किंवा मोटरमध्ये बिघाड असेल आणि घराची ‘अर्थिंग’ योग्य नसेल, तर कुलरच्या संपूर्ण लोखंडी बॉडीमध्ये विजेचा प्रवाह उतरतो. अशा वेळी जमिनीवर अनवाणी पायाने उभे राहून किंवा ओल्या हाताने कुलरला स्पर्श केल्यास तीव्र शॉक बसू शकतो, जो जीवावर बेतू शकतो. त्यामुळे घराची वीज यंत्रणा सुरक्षित असणे आणि अर्थींगची तपासणी करणे गरजेचे आहे.

सुरक्षित गारव्यासाठी ‘हे’ नियम नक्की पाळा:

पाणी भरताना सावधानता: कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी त्याचा मुख्य स्विच बंद करून प्लग सॉकेटमधून पूर्णपणे बाहेर काढावा. चालू कुलरमध्ये कधीही पाणी भरण्याची चूक करू नये. आयएसआय (ISI) मार्कच निवडा: बाजारातून कुलर खरेदी करताना नेहमी ‘आयएसआय’ मार्क असलेला दर्जेदार कुलर आणि वायरच खरेदी करा. स्वस्त आणि स्थानिक बनावटीचे कुलर टाळा. तज्ज्ञांकडून तपासणी: कुलर उन्हाळ्यात पहिल्यांदा सुरू करण्यापूर्वी अधिकृत वायरमन किंवा इलेक्ट्रिशियनकडून त्याची मोटर, पंप आणि घराच्या अर्थिंगची व्यवस्थित तपासणी करून घ्यावी. ओल्या हातांनी स्पर्श टाळा: हात ओले असताना किंवा पाय ओले असताना कोणत्याही विद्युत उपकरणाला, वायरला अथवा स्विचला स्पर्श करू नये. कुलरच्या जवळ वावरताना पायात रबरी चप्पल असणे अधिक सुरक्षित ठरते.

स्वतंत्र पॉवर सॉकेट: कुलरसाठी नेहमी योग्य क्षमतेच्या स्वतंत्र पॉवर सॉकेटचा वापर करावा. एकाच सॉकेटवर मल्टिप्लग जोडून कुलरसोबत इतर मोठी उपकरणे चालवणे टाळावे, यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो. गृहिणी आणि लहान मुलांची विशेष काळजी: घरातील लहान मुले खेळताना कुलरच्या लोखंडी जाळीला स्पर्श करण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे मुलांना कुलरपासून सुरक्षित अंतरावर ठेवावे. महिलांनीही ओल्या हाताने किंवा ओल्या कपड्याने कुलर हाताळू नये. त्वरित दुरुस्ती: कुलर चालताना काही वेगळा आवाज येत असल्यास, किंवा त्याची वायर कुठे कट झाली असल्यास तात्काळ त्याचा वापर बंद करून तज्ज्ञांकडून तो दुरुस्त करून घ्यावा.

जर एखाद्या व्यक्तीला विजेचा धक्का लागला, तर त्याला कधीही थेट हाताने ओढण्याचा प्रयत्न करू नये. सर्वात आधी मुख्य वीज प्रवाह बंद करावा. त्यानंतर कोरड्या लाकडी काठीच्या, रबरी वस्तूच्या किंवा प्लास्टिकच्या साहाय्याने त्या व्यक्तीला विजेच्या स्रोतापासून दूर करावे आणि त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावी.

२४ तास टोल-फ्री क्रमांक उपलब्ध

विद्युत सुरक्षेबाबत कोणतीही शंका असल्यास किंवा एखादा तातडीचा अपघात घडल्यास नागरिकांनी महावितरणच्या 1912, 19120, 1800 212 3435 किंवा 1800 233 3435 या २४ तास सुरू असलेल्या टोल-फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा. “घरातील विद्युत उपकरणांची वेळोवेळी तांत्रिक तपासणी करा, सतर्क राहा आणि सुरक्षित उन्हाळ्याचा आनंद घ्या,” असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button