
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील डिप्राटोला येथील विक्रेत्यांविरोधात मोहीम राबवित देशी व विदेशी दारू जप्त करीत नष्ट करण्यात आली. याप्रकरणी एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आले. ही कारवाई कुरखेडा पोलिस, गावातील महिला व मुक्तीपथ टीमने संयुक्तरीत्या केली.
डिप्राटोला येथील महिलांनी गावात दारूविक्री बंदी करण्याचा ठराव पारित करून दारूविक्री करताना आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. महिलांनी आमच्या गावात दारूविक्री नको, असे म्हणत दारूविक्री बंद करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत दारूमुक्त गाव निर्माण करण्याचे ठरविले होते. गावातील महिलांनी ठराव पारित होताच अंमलबजावणी सुरू केली. दुसऱ्या दिवशी घोषणा देत रॅली काढण्यात आली. यामध्ये सहभागी महिलांनी विक्रेत्यांना नोटीस बजावत दारूविक्री तत्काळ बंद करा, अन्यथा कायदेशीर कारवाई व दंड वसूल करण्यात येईल. यासाठी एक दिवसाची मुदत विक्रेत्यांना देण्यात आली होती.
दरम्यान, गावात अवैध सुरू असल्याची माहिती मिळताच गावातील महिला, पोलिस व मुक्तीपथ टीमने 5 विक्रेत्यांच्या घरी तपासणी केली असता, विक्रेत्यांकडे दारू मिळून आली. महिलांनी मुद्देमाल नष्ट केला. याप्रकरणी एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच इतर विक्रेत्यांना पुन्हा दारूविक्री केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. या कारवाईमुळे इतर विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. ही कारवाई पीएसआय संदीप ताराम व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.
यावेळी मुक्तीपथच्या शारदा मेश्राम, गाव संघटनेच्या गीता ताराम, मीराबाई ग्यानझोरी, समना कुमरे, पद्मा नेटी, सुनीता नेटी, उर्मिला कुंजाम, तीलकम नैताम, शकून नैताम, कलाबाई नैताम, लता नेटी, महाबाई कोराम, यशोदा मडावी, चंद्रकला मडावी, लीला सोरी यांच्यासह महिला उपस्थित होत्या.



