भंडाराविदर्भ

जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीत नाविन्यपूर्ण मॉडेल्सचे सादरीकरण

विभागीय स्तरासाठी उत्कृष्ट मॉडेल्सची निवड ; मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण

भंडारा : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), भंडारा येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीतून प्रशिक्षणार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळाले असून, विविध तांत्रिक मॉडेल्सनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता आणि तंत्रज्ञानाचे जनक भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. या प्रदर्शनीचे उद्घाटन नगर परिषद उपाध्यक्ष चंद्रकलाताई भोपे यांच्या हस्ते झाले. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर. बी. गणवीर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. याप्रसंगी जिल्हा इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष रामविलासजी सारडा, आय.एम.सी. सदस्य जी. ई. भोंगाडे, अमित अनवेकर, एन. पी. तुमाने, प्रा. डॉ. देवेंद्र सोनटक्के, तसेच संजय लोहे, व्ही. आर. दहापुते, एस. एच. धोटे आणि संस्थेचे प्राचार्य व्ही. एम. लाकडे प्रामुख्याने उपस्थित होते.

चंद्रकला भोपे यांनी “प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेली मॉडेल्स कौतुकास्पद आहेत. विद्यार्थ्यांनी संघर्षातून मार्ग काढत तंत्रज्ञानात प्रगती करावी,” असे आवाहन केले. रामविलास सारडा यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे महत्त्व सांगताना स्पष्ट केले की, तांत्रिक शिक्षणामुळे तरुण स्वतःच्या उपजीविकेची साधने स्वतःच निर्माण करू शकतात. आर. बी. गणवीर यांनी “या प्रदर्शनीच्या माध्यमातून जिल्हा आणि राज्यस्तरापर्यंत पोहोचण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते,” असे मत व्यक्त केले.

संस्था आणि तालुका स्तरावरून निवडण्यात आलेल्या उत्कृष्ट मॉडेल्सचा समावेश या जिल्हास्तरीय प्रदर्शनीमध्ये करण्यात आला होता. जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी आयटीआयमधील प्रशिक्षणार्थ्यांनी यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यातील विजेत्या मॉडेल्सची निवड आता विभागीय स्तरावरील प्रदर्शनीसाठी करण्यात आली आहे. सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य व्ही. एम. लाकडे यांनी केले. सूत्रसंचालन निदेशक ए. डी. दिघोरे यांनी, तर आभार प्रदर्शन व्ही. एस. भुरे यांनी केले. या प्रदर्शनीच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सर्व निदेशक, शिल्पनिदेशक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button