
आरमोरी : येथील मुक्तीपथ तालुका कार्यालयात २२ जानेवारी रोजी शहर संघटनेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शहरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर कडक निर्बंध घालण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीनंतर तात्काळ अंमलबजावणी करत कार्यकर्त्यांनी महात्मा फुले वॉर्ड आणि गायकवाड चौक परिसरातील विक्रेत्यांकडून अंदाजे ५ हजार रुपये किमतीची दारू पकडून ती नष्ट केली.
शहर संघटना अध्यक्ष देवेंद्र सोनकुसरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रत्येक वॉर्डात मुक्तीपथ संघटना तयार करून ती अधिक सक्षम करणे. शहरातील ठोक दारू विक्रेत्यांविरुद्ध मोहीम राबवणे. अवैध दारू विक्री रोखण्यासाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन कडक कारवाईची मागणी करणे. वॉर्डातील रुग्णांना तालुका क्लिनिकमध्ये व्यसन उपचारासाठी पाठवणे आणि ठिकठिकाणी ‘मोहल्ला क्लिनिक’चे आयोजन करणे आदी मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
बैठक संपल्यानंतर मुक्तीपथच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय होत महात्मा फुले वॉर्डातील ४ विक्रेते आणि गायकवाड चौकातील २ विक्रेत्यांकडे ‘अहिंसक कृती’ केली. यावेळी देशी, विदेशी, मोहफुलाची दारू आणि बिअर असा एकूण ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व तो जागीच नष्ट करण्यात आला.
या बैठकीला व मोहिमेला उपाध्यक्ष प्रज्ञा निमगडे, सचिव शुभांगी गराडे, सोशल मीडिया प्रमुख भारती मेश्राम, सदस्य सुनीता तागवान, योजना मेश्राम, लता बारसागडे, प्रीती सारवे, मालन वाकडे, प्रियंका साळवे, राजेंद्र बारसागडे तसेच मुक्तीपथ तालुका संघटक विनोद कोहपरे, उपसंघटक मनीषा प्रधान, प्रेरक बुद्धा पोरटे आणि स्पार्क विद्यार्थी शुभम कलोडे उपस्थित होते.



