
देशभर स्मारक सभेचेही आयोजन
गडचिरोली : प्रतिबंधित माओवादी संघटनेने (नक्षलवाद्यांनी) आपला सर्वोच्च नेता गंगन्ना उर्फ बसवराजू याच्या एन्काऊंटरनंतर संताप व्यक्त करत येत्या १० जून रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारने शांतता आणि युद्धबंदीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करून २१ मे रोजी २७ माओवाद्यांची हत्या केल्याचा आरोप करत, सरकारचा निषेध करण्यासाठी हे बंदचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी देशभरात ‘स्मारक सभा’ आयोजित करण्याचेही नक्षलवाद्यांचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे.
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर काही दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवराजू (जो गंगन्ना या नावानेही ओळखला जातो) याचा मृत्यू झाला होता. माओवाद्यांच्या जनरल सेक्रेटरी असलेल्या बसवराजूच्या या एन्काऊंटरनंतर माओवादी चांगलेच संतापले आहेत. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने काढलेल्या पत्रकात (प्रवक्ता अभय यांनी जारी केलेले) म्हटले आहे की, केंद्र सरकारने माओवाद्यांच्या शांतता आणि युद्धबंदीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करत २१ मे रोजी २७ माओवाद्यांची हत्या केली. जानेवारी २०२४ पासून केंद्र सरकारने अशाच पद्धतीने ५४० माओवाद्यांना मारल्याचे गंभीर आरोपही या पत्रकातून करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या याच धोरणाचा विरोध करण्यासाठी १० जूनला देशव्यापी बंदचे आवाहन माओवाद्यांनी केले आहे. एवढेच नाही तर, ११ जून ते ३ ऑगस्ट दरम्यान काम्रेड बसवराजू आणि इतर मारल्या गेलेल्या माओवाद्यांच्या स्मृतीत ‘स्मारक सभा’ आयोजित करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, माओवाद्यांकडून करण्यात आलेले दावे, ज्यात आत्मसमर्पण धोरण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या संधींना ‘संघर्षविरामाचा एक मार्ग’ म्हटले आहे, तसेच ‘पाकिस्तानचा युद्धबंदीचा प्रस्ताव एका क्षणात मान्य केला, तर दोन महिन्यांपासून आम्ही देत असलेल्या युद्धबंदीच्या प्रस्तावाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे,’ यावर महाराष्ट्र नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख संदीप पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी माओवाद्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसवराजू मारला गेल्यानंतर माओवाद्यांची आगपाखड झाली असल्याने माओवादी असे दावे करत असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले.
माओवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल समितीचा प्रवक्ता विकल्पने बसवराजूच्या मृत्यूनंतर नुकतेच एक पत्रक काढून हे दावे केले होते. जंगलात माओवाद्यांची उडालेली दाणादाण आणि होत असलेली पीछेहाट बघता, माओवाद्यांचा हा संघर्ष जंगलातून शहराकडे येण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही, असेही पाटील यांनी नमूद केले. मात्र, ‘आम्ही तितकेच सतर्क आहोत,’ असे संदीप पाटील यांनी ठामपणे सांगितले.



