क्रीडागडचिरोलीविदर्भ

आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मैदानी खेळ आवश्यक – आ. डॉ. मिलिंद नरोटे

अप्पर-डिप्पर क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात ; चार संघांमध्ये रंगणार चुरशीच्या लढती

गडचिरोली : “आजच्या धावपळीच्या युगात शरीर आणि मन सुदृढ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि मैदानी खेळ ही काळाची गरज बनली आहे. क्रिकेटसारखे खेळ केवळ मनोरंजन नसून ते शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत,” असे प्रतिपादन गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले.

शनिवार, २४ जानेवारी रोजी स्थानिक शिवाजी महाविद्यालयालगत असलेल्या स्व. गंगुवार मैदानावर अप्पर-डिप्पर ग्रुपच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर होत्या. व्यासपीठावर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष निखिल चरडे, समशेर खान पठाण, डीवायएसपी सुनील महाडीक, प्रेस क्लब अध्यक्ष मिलिंद उमरे, सामाजिक कार्यकर्ते बलराम सोमनानी, डॉ. यशवंत दुर्गे, राजेश इटनकर, नगरसेवक सागर निंबोरकर, रवि मेश्राम, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, अविनाश वरगंटीवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

अप्पर-डिप्पर ग्रुपच्या वतीने आयोजित होणाऱ्या या स्पर्धेचे यंदाचे मुख्य आकर्षण म्हणजे संघांची नावे. यापूर्वी पर्यावरणाशी संबंधित नावे दिली जात होती, मात्र यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाची आठवण करून देण्यासाठी किल्ल्यांच्या नावाने संघ उतरवण्यात आले आहेत. सिंहगड लायन्स संघाचे मालक निखिल मंडलवार, प्रतापगड पँथर्सचे मालक अनुराग पिपरे, शिवनेरी वॉरियर्सचे मालक बलराम सोमनानी तर रामगड रॉयल्सचे मालक डॉ. यशवंत दुर्गे आहेत.

स्पर्धेच्या उद्घाटनानंतर सर्व संघमालक आणि खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालणार असून, विजेत्या संघाला आकर्षक चषक आणि भरघोस रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रुपचे अध्यक्ष रूपराज वाकोडे यांनी केली. संचालन रमन गागापुरवार यांनी तर आभार प्रदर्शन नितेश खडसे यांनी केले. मैदानावर क्रिकेटप्रेमींची मोठी गर्दी उसळली असून येत्या आठवड्यात चुरशीचे सामने पाहायला मिळणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button