चंद्रपूरविदर्भ

कम्युनिस्ट पक्षाचा ‘शताब्दी महा एल्गार’ मेळावा ; आवळगाव येथे शंभर वर्षपूर्तीचा उत्साह

१ फेब्रुवारीला वैनगंगा टी-पॉईंटवर ‘चक्का जाम’ आंदोलनाची घोषणा

ब्रह्मपुरी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथे शनिवार, २४ जानेवारी रोजी ‘शताब्दी महा एल्गार मेळावा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात जिथे पक्षाच्या देदिप्यमान इतिहासाचा जागर करण्यात आला, तिथेच स्थानिक जनसमस्यांवरून १ फेब्रुवारी रोजी तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साही वातावरणात झाली. गावापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत मुलींच्या लेझीम पथकाने आणि डफलीच्या तालावर पाहुण्यांचे स्वागत केले. सर्वप्रथम ध्वजारोहण करून पक्षाच्या लाल बावट्याला मानवंदना देण्यात आली, त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून सभेची सुरुवात झाली.

या महोत्सवाचे उद्घाटन अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. राजन क्षीरसागर (नवी दिल्ली) यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय आदिवासी महासभेचे राज्य सचिव कॉ. प्रा. नामदेव कन्नाके होते. प्रमुख वक्ते म्हणून ‘आयटक’च्या राष्ट्रीय सचिव कॉ. बबली रावत (मुंबई), कॉ. श्याम काळे (नागपूर) आणि कॉ. डॉ. महेश कोपुलवार (आरमोरी) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक रामटेके, मिलिंद भनारे, भूषण रामटेके, विनोद नवघडे, कॉ. रवींद्र उमाटे, कॉ. देवराव चवळे, अ‍ॅड. जगदीश मेश्राम, आवळगावचे सरपंच प्रीतम बाबनवाडे, आयटकचे अध्यक्ष कॉ एन.टी. म्हस्के, कॉ. दिलीप बर्गि, प्रदीप चिताडे, राजु गईनवार, प्रकाश रेड्डी, महिला नेत्या कॉ. ज्योती अंडरशहारे, वनिता कुणटावार, निकिता नीर, कुंदा कोहपरे, यांसह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंचावर उपस्थित होते.

शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून स्थानिक प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. गांगलवाडी-आवळगाव-मूडझा-व्याहाड रोडचे बांधकाम तत्काळ पूर्ण करावे, खड्डे बुजवावेत आणि रात्री धावणारी अवैध रेतीची वाहतूक थांबवावी, या मागण्यांसाठी १ फेब्रुवारी रोजी गांगलवाडी वैनगंगा नदी टी-पॉईंटवर तीव्र ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याची घोषणा भाकप नेते कॉ. विनोद झोडगे यांनी केली.

कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक-युवती, पुरुष, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. विनोद झोडगे यांनी केले.

धम्मा खडसे यांच्या क्रांतिकारी जलशाने भरला जोश

अमरावतीचे सुप्रसिद्ध लोकशाहीर कॉ. धम्मा खडसे यांच्या क्रांतिकारी शायरी जलश्याने या सोहळ्याची शोभा वाढवली. पाहुण्यांचे आगमन होईपर्यंत तब्बल दोन-तीन तास खडसे यांनी आपल्या पहाडी आवाजात आणि प्रेरक गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणामुळे शेतकरी, शेतमजूर आणि तरुणांमध्ये भगतसिंग-राजगुरू यांच्या विचारधारेचा क्रांतिकारक जोश निर्माण झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button