
ग्रंथदिंडी, पथनाट्य आणि सांस्कृतिक आविष्काराने दुमदुमले शहर ; पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांच्यासह तज्ञांचे मार्गदर्शन
देसाईगंज : “झाडी आणि माडिया गोंडी या केवळ बोलीभाषा नसून त्या निसर्गाशी समरस झालेली समृद्ध संस्कृती आहेत. बोलीभाषा हा आपल्या संस्कृतीचा आत्मा असून, आधुनिकीकरणाच्या युगात तिचे जतन करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन मान्यवर तज्ञांनी केले. मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, गोंडवाना विद्यापीठ आणि आदर्श महाविद्यालय, देसाईगंज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बोलींचा जागर: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ हा उपक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात देसाईगंज शहरातून काढण्यात आलेल्या भव्य ग्रंथदिंडीने झाली. आदिवासी नृत्य, लेझीम, भजने आणि लोकगीतांच्या तालावर संपूर्ण शहर न्हाऊन निघाले होते. विशेष म्हणजे, मुख्य बाजारपेठेतून दिंडी जात असताना स्थानिक व्यापाऱ्यांनीही पालखी धरण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. झाडीबोलीतील पारंपरिक मंगलाष्टके आणि हिरालाल पेंटर यांच्या नकलांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. सदानंद बोरकर यांनी झाडीबोलीचे महत्त्व विशद करताना सांगितले की, झाडीपट्टी रंगभूमीवर सध्या १० हजारांहून अधिक कलाकार कार्यरत असून, याद्वारे वर्षाला सुमारे ८० कोटी रुपयांची उलाढाल होते. ४ हजारपेक्षा जास्त नाट्यप्रयोग होणारी ही बोली खऱ्या अर्थाने रोजगार देणारी बोली ठरली आहे. डॉ. श्याम मोहरकर यांनी झाडीबोलीवर असलेल्या गोंड राजवटीच्या प्रभावाचा उल्लेख करत या बोलीत ५० हजार शब्दांची नोंद असल्याचे सांगितले.
माडिया गोंडी भाषेवर प्रकाश टाकताना डॉ. नरेश मडावी यांनी सांगितले की, ही अतिशय प्राचीन आणि स्वयंपूर्ण भाषा आहे. द्राविडीयन भाषाकुलातील ही भाषा देशातील १५ राज्यांत बोलली जाते. या भाषेचे संवर्धन करण्यासाठी शब्दसंग्रह तयार करणे आणि शालेय स्तरावर तिचे स्थान वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
पद्मश्री डॉ. परशुराम खुणे म्हणाले, “आपल्या बोलीवर प्रेम करा आणि संस्कृतीतील सूक्ष्म बारकावे जपा. तरुणांनी बोलीभाषेचा न्यूनगंड बाळगू नये.” प्राचार्य डॉ. श्रीराम गहाने म्हणाले, “बोलींच्या जागर कार्यक्रमातून झाडी आणि माडिया गोंडीचा इतिहास व वैशिष्ट्ये आजच्या पिढीला समजली.” अभयराजे कुलकर्णी (भाषा संचालक) म्हणाले, “बोलीभाषेतील शब्दांचा वापर प्रमाणभाषेत वाढल्यास मराठी भाषा अधिक समृद्ध होईल.”

कार्यक्रमात झाडीपट्टीतील ‘बहिणाबाई’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंजनाबाई खुणे यांनी म्हणी आणि कवितांचे सादरीकरण केले. तसेच प्रा. धनराज खानोरकर, डॉ. नरेंद्र आरेकर आणि डॉ. सविता गोविंदवार यांनीही आपले विचार मांडले. सांस्कृतिक सत्रात दंडार, भारुड आणि लोकनृत्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सविता गोविंदवार यांनी केले, संचालन प्रा. वैशाली लिचडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. निहार बोदेले यांनी केले. या सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



