महाराष्ट्र शोकसागरात: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन ; मुख्यमंत्र्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

“मी माझा दमदार आणि दिलदार मित्र गमावला” – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे व्यक्तिमत्व, ‘दादा’ या नावाने सर्वसामान्यांच्या मनावर राज्य करणारे जननेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. या भीषण अपघातात दादांसह अन्य ४ जणांचाही मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
“मी माझा दमदार आणि दिलदार मित्र गमावला”
अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावूक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “अजितदादांचा अपघाती मृत्यू मनाला व्यथित करणारा आहे. जमिनीशी घट्ट नाळ असलेला एक जननेता आणि माझा दमदार, दिलदार मित्र मी गमावला आहे. हे माझे वैयक्तिक आणि महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.”
या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आजचे सर्व नियोजित शासकीय आणि राजकीय कार्यक्रम तातडीने रद्द केले आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि जवळच्या मित्राला अखेरचा निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस बारामतीकडे रवाना झाले.
अजितदादांच्या विमानाला झालेल्या अपघातात अन्य ४ सहकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. उपमुख्यमंत्री आणि अन्य मृतांच्या निधनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस परिवार आणि पवार कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत असल्याचे सांगून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अजितदादांच्या निधनामुळे राजकारणातील एका पर्वाचा अंत झाला आहे. शिस्तबद्ध प्रशासन आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे दादा गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. त्यांच्या निधनामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.



