
माजी खा. डॉ. अशोक नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन… ; सेवेच्या वाटेवरून नेतृत्वाकडे सामाजिक जाणिवेचा सन्मान
गडचिरोली : समाजासाठी निस्वार्थपणे झटणारे, दीन-दलित, शोषित, वंचित व गरिबांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवणारे संवेदनशील नेतृत्व म्हणून आशिष अरुण पिपरे यांनी आपल्या कार्यातून समाजमनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या समाजसेवेची, लोकहिताच्या कार्याची दखल घेत त्यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, नवी दिल्ली – विदर्भ अध्यक्ष तसेच समस्त तेली समाजाच्या वतीने महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नगरसेवक म्हणून कार्यरत असताना पिपरे यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या पाणी समस्या, पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, वीज, आरोग्य, शिक्षण,मुला़साठी क्रिडागण , यांसारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत अनेक समस्या मार्गी लावल्या. सर्वसामान्य माणसाच्या अडचणी आपल्याच समजून त्या सोडविण्याची त्यांची भूमिका नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरली आहे.
सण-उत्सव असो वा सामाजिक कार्यक्रम, दिवाळी, आपला वाढदिवस, महिलांचा मकरसंक्रांत उत्सव असो—ते नेहमीच आपल्या वार्डात व प्रभागात नागरिकांसोबत आनंद साजरा करताना दिसतात. त्याचप्रमाणे दुःखाच्या प्रसंगीही ते मदतीसाठी धावून जातात. महिलांसाठी साडी वाटप, गरजू घटकांसाठी मदतीचे उपक्रम, विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग हा त्यांच्या कार्याचा अविभाज्य भाग आहे.
विशेषतः ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीत त्यांनी दिवस-रात्र मेहनत घेत पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक महिलांना या योजनेत सामावून घेण्यासाठी त्यांनी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा केला. दीन-दलित, शोषित व वंचित घटकांसाठी जपणूकभावाने काम करताना सामाजिक न्याय, मानवाधिकार आणि समतेचा संदेश त्यांनी कृतीतून दिला. त्यांच्या समाजकार्यातील निष्ठा, सातत्य व प्रामाणिकपणा पाहता ही नियुक्ती म्हणजे त्यांच्या कार्याची योग्य पावती असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
या नियुक्तीनिमित्त गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी आशिष पिपरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत अभिनंदन केले. डॉ. अशोक नेते यांनी नेहमीच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत चामोर्शी येथील आशिष पिपरे यांच्या वार्ड व प्रभागात विविध विकासकामे मंजूर करून दिली. वेळोवेळी मार्गदर्शन, सहकार्य व आशीर्वाद देत त्यांनी त्यांच्या कार्याला बळ दिले आहे.
ही नियुक्ती केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल आहे. सामाजिक बांधिलकी, लोकहिताची जाणीव आणि नेतृत्वगुण यांच्या जोरावर आशिष पिपरे पुढील काळातही समाजहितासाठी अधिक भक्कम भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त केला. गडचिरोली जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब असून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



