क्राईमगोंदियाविदर्भ

कौटुंबिक वाद ; पतीने गळा आवळून केला पत्नीचा खून 

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गौरनगर येथील घटना ; पतीला अटक 

गोंदिया : पतीने पत्नीशी क्षुल्लक कारणावरून वाद घालून तिचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गौरनगर येथे घडली आहे. ही घटना २६ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ३:४५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिसांनी आरोपी पतीला गडचिरोली जिल्ह्यातून शिताफीने अटक केली आहे.

मृतक महिलेचे नाव कल्पना कमल विश्वास (४२) असून आरोपी पतीचे नाव कमल केशव विश्वास (४४) आहे. कमल हा मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील रहिवासी आहे. प्राप्त माहितीनुसार, कमल हा कामानिमित्त बाहेरगावी वास्तव्यास होता. पत्नी कल्पनाने त्याला बाहेरगावी न राहता गौरनगर येथेच सोबत राहण्याचा आग्रह धरला होता. मात्र, कमलने याला नकार दिला. २५ जानेवारीच्या रात्री १०:३० ते २६ जानेवारीच्या पहाटे ३:४५ दरम्यान याच विषयावरून दोघांमध्ये त्यांच्या राहत्या झोपडीत तीव्र वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि रागाच्या भरात कमलने कल्पनाच्या छातीवर बसून तिचा गळा आवळून तिची हत्या केली.

हत्येच्या घटनेनंतर आरोपी कमल हा पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचा किंवा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करत गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील गुरुनुली येथे पळून गेला. तेथे गेल्यावर आपला या घटनेशी काहीही संबंध नसल्याचा बनाव तो रचत होता. घटनेची माहिती मिळताच अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात तपासाची चक्रे फिरली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुनुली येथून कमलला ताब्यात घेतले. सुरुवातीला नकार देणाऱ्या कमलने पोलिसी खाक्या दाखवताच आपला गुन्हा कबूल केला.

अर्जुनी मोरगाव पोलिसांनी आरोपी कमल विश्वास विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अर्जुनी मोरगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button