गडचिरोलीविदर्भ

सर्वपक्षीय शोकसभेत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

विमान अपघातात झालेल्या निधनाने जिल्हा शोकाकुल

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या महान नेतृत्वाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गडचिरोलीतील इंदिरा गांधी चौक येथे सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राजकीय भेदाभेद विसरून सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अश्रूपूर्ण नयनांनी दादांच्या स्मृतींना उजाळा दिला.

‘कर्तव्यनिष्ठ आणि निर्णयक्षम नेतृत्व हरपले’ – डॉ. अशोक नेते

या श्रद्धांजली सभेला प्रामुख्याने उपस्थित असलेले माजी खासदार तथा भाजप एसटी मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “अजितदादांचे निधन ही केवळ एका पक्षाची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची हानी आहे. त्यांच्या रूपाने राज्याने एक अत्यंत अभ्यासू, शिस्तप्रिय आणि गतिमान निर्णय घेणारे नेतृत्व गमावले आहे. गडचिरोलीच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका घेतली. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.”

या शोकसभेला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, डॉ. नामदेवराव उसेंडी, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर, प्रशांत वाघरे, रोहीदास राऊत (रिपब्लिकन पार्टी), रेखा डोळस, रमेश भुरसे, बब्बलूभाई हुसैनी यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष तथा नगर परिषद पाणीपुरवठा सभापती लिलाधर भरडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. सभेच्या शेवटी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर इंदिरा गांधी चौकात मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेला “अजितदादा अमर रहे” हा नारा वातावरणात एक वेगळीच भावुकता निर्माण करून गेला.

अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजताच गडचिरोली शहरासह ग्रामीण भागातही सर्व व्यवहार काही काळ थंडावले होते. सर्वसामान्य जनतेचा कैवारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादांच्या जाण्याने गडचिरोलीतील नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र दुःख व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button