गोंदियाविदर्भ

डीपीएम वानखेडे यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यात केली अरुणोदय सिकलसेल अभियानाची पाहणी

० ते ४० वयोगटातील नागरिकांची होणार मोफत तपासणी; ‘कलर कोडेड‘ कार्डांद्वारे रुग्णांचे वर्गीकरण

गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत, आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये ‘अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान’ राबविले जात आहे. १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या या अभियानाचा मुख्य उद्देश सिकलसेल आजाराचे समूळ उच्चाटन करणे हा असून, गोंदिया जिल्ह्यात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या समन्वयाने या मोहिमेने गती घेतली आहे.

जिल्हाधिकारी प्रजित नायर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य संस्थेमार्फत तपासणी, निदान आणि उपचारांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

२८ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांच्या पथकाने मोरगाव अर्जुनी तालुक्यातील आरोग्य संस्थांना भेटी देऊन अभियानाचा आढावा घेतला. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हा मूल्यमापन अधिकारी उकादास बिसेन, सार्वजनिक अधिपरिचारिका निलु चुटे आणि आरोग्य सेविका कल्याणी चौधरी यांनी आयुष्मान आरोग्यवर्धिनी मंदिर बाराभाटी व कुंभीटोला येथे प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.

तपासणी दरम्यान पथकाने ग्रामपातळीवरील आशा सेविका व आरोग्य सेवकांना औषधोपचार: सिकलसेल ग्रस्त व वाहक रुग्णांची यादी करून त्यांना नियमित ‘फॉलिक ॲसिड’ पुरवणे. निशुल्क औषधी: आवश्यक रुग्णांना ‘हायड्रॉक्सीयुरिया’ या औषधाचा पुरवठा जवळच्या ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातून मोफत उपलब्ध करून देणे. कार्ड वाटप: शासन निर्णयानुसार रुग्णांना लाल, पिवळे व पांढरे कार्ड वाटप करून त्याची अद्ययावत माहिती ठेवणे. लक्षित गट: ० ते ४० वयोगटातील स्त्री-पुरुष, गरोदर माता आणि किशोरवयीन मुलांची प्राधान्याने रक्त तपासणी व समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या.

या पाहणी दौऱ्यात समुदाय आरोग्य अधिकारी गौरव टेंभेकर व तृप्ती गहाणे, आरोग्य सेविका निराशा शहार, यमुना मानापुरे व सविता कोडाप, तसेच आशा सेविका कल्पना भंडारी व वंदना धानगाये उपस्थित होत्या. या अभियानामुळे जिल्ह्यात सिकलसेल आजाराबाबत मोठी जनजागृती होत असून, दुर्गम भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button