गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना विद्यापीठात ‘नो-एज ६.०’ व्याख्यानमाला ; दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ठरतेय ‘ज्ञानगंगा’

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या इंग्रजी पदव्युत्तर शिक्षण विभागातर्फे आयोजित ‘नो-एज ६.०’ या पाच दिवसीय ऑनलाइन व्याख्यानमालेचे सहावे पर्व नुकतेच यशस्वीरित्या संपन्न झाले. २७ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत चाललेल्या या उपक्रमातून शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती संशोधक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली.

या पाच दिवसीय व्याख्यानमालेत साहित्य, तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्र आणि कौशल्य विकासावर आधारित वैविध्यपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. उद्घाटन सत्रात शासकीय तंत्रनिकेतनचे चेतन निखारे यांनी ‘अशाब्दिक संवाद’ या विषयावर प्रभावी सादरीकरण केले. सिक्कीम येथील डॉ. बालाजी शेळके यांनी ‘मानवतावाद ते उत्तर-मानवतावाद’ तर राजश्री परिहार यांनी ‘उत्तर-मानवीय लेखक’ यावर प्रकाश टाकला. प्रा. हितेंद्र धोटे यांनी साहित्याला सामाजिक जागरूकतेचे साधन म्हणून मांडले. बेंगळुरू येथील श्रीनिवास यांनी ‘संशोधन निबंधाची रचना’ यावर मार्गदर्शन केले, तर डॉ. प्रीती पाटील यांनी ‘स्त्रीवादी सिद्धांत’ विशद केला. नागपूरचे मेमरी कोच निलेश सरजारे यांनी स्मरणशक्ती आणि इंग्रजी शिकण्याच्या सोप्या पद्धती सांगितल्या. रहीम पटेल यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि शैक्षणिक धोरणाची सांगड घातली. संशोधन विद्यार्थिनी उजमासीरिन खान यांनी जीवनातील अनुभवांचे महत्त्व सांगून मालिकेची सांगता केली.

अंतिम सत्राच्या अध्यक्षीय भाषणात इंग्रजी विभागप्रमुख प्रा. विवेक जोशी यांनी या उपक्रमाच्या यशाचा पाढा वाचला. ते म्हणाले की, “२०२१ पासून सुरू झालेला हा प्रवास आज सहाव्या टप्प्यावर पोहोचला आहे. ‘नो-एज’ मालिकेतील ७० हून अधिक दर्जेदार व्याख्याने आता युट्युबवर कायमस्वरूपी उपलब्ध आहेत. याचा सर्वाधिक फायदा गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थी आणि संशोधकांना होत आहे.”

या व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन समन्वयक डॉ. अतुल गावस्कर व डॉ. वैभव मसराम यांनी केले. त्यांना सह-समन्वयक डॉ. शिल्पा आठवले व डॉ. प्रमोद जावरे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. या ऑनलाईन उपक्रमात राज्यभरातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि अभ्यासकांनी मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग नोंदवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button