चंद्रपूरविदर्भ

लॉयड्स कप औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत चंद्रपूर परिमंडळ उपविजेता!

मुख्य अभियंता हरिश गजबे यांच्या हस्ते संघाचा विशेष सत्कार

चंद्रपूर : महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी केवळ वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यातच नव्हे, तर खेळाच्या मैदानातही अव्वल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. घुगुस येथील लॉयड्स मेटल्स लीगतर्फे आयोजित ‘लॉयड्स कप २०२५-२६’ या औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत महावितरण चंद्रपूर परिमंडळाच्या संघाने अटीतटीच्या लढतीत उपविजेतेपद पटकावून आपल्या क्रीडा कौशल्याचा ठसा उमटवला आहे.

या औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत एकूण १४ नामांकित कंपन्यांच्या संघांनी सहभाग नोंदवला होता. महावितरण चंद्रपूर परिमंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन एक दमदार संघ मैदानात उतरवला होता. आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर महावितरणने सलग ३ बाद फेरीत (Knockout matches) विजय मिळवून अंतिम फेरीत धडक दिली. ११ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या अंतिम सामन्यात उपविजेतेपदाचा बहुमान पटकावला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण एम.आय.डी.सी. चंद्रपूरचे अध्यक्ष रुंगटा आणि लॉयड्स मेटल घुगुसचे मुख्याधिकारी वाय. जी. एस. प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या उपस्थितीत महावितरणच्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. मैदानातील या यशाची दखल घेत ०३ फेब्रुवारी रोजी महावितरण चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरिश गजबे यांनी उपविजेत्या संघाचा विशेष सत्कार केला. यावेळी त्यांनी खेळाडूंचे कौतुक करताना म्हटले की, “कामाच्या व्यापातून वेळ काढून खेळाप्रती दाखवलेली ही निष्ठा प्रेरणादायी आहे.”

या सत्कार सोहळ्याप्रसंगी परिमंडळातील विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण परिमंडळात आनंदाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button