
गडचिरोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; ७२ तासांत शोधले खुनाचे रहस्य
कोरची : मौजा बोगाटोला येथील जंगलात अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळलेल्या एका अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र, गडचिरोली पोलिसांनी या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक खुनप्रकरणाचा छडा केवळ ७२ तासांत लावला आहे. अनैतिक प्रेमसंबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, याप्रकरणी पाच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
३१ जानेवारी रोजी बोगाटोला जंगल परिसरात एका इसमाचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या स्थितीत आढळून आला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृताची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. मात्र, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कोरची पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) संयुक्त तपासाचे आदेश दिले. वैद्यकीय अहवालात मानेवर धारदार शस्त्राने वार झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी हत्येच्या दिशेने वेगाने चक्र फिरवली.
तपासादरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले. मयत जितू कवंर (वय ३०) याची पत्नी सोनाली कवंर हिचे शानु पठाण याच्याशी अवैध प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांत पती जितू अडथळा ठरत होता. अखेर त्याला कायमचे संपवण्याचा कट रचण्यात आला. जितू कवंर जेव्हा खुर्शीपार येथे आला होता, तेव्हा मुख्य आरोपी शानु पठाण याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात पुरला.
पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे ४ फेब्रुवारी रोजी शानु पठाण (३६) रा. जांभुळखेडा (मुख्य आरोपी), पुंकेश बोरकर (३२) रा. जांभुळखेडा, चंद्रशेखर गुज्जेवार (२७) रा. जांभुळखेडा, धनपाल मडावी (२१) रा. जांभुळखेडा, सोनाली कवंर (२५) रा. डोंगरगड, छत्तीसगड (मृताची पत्नी) या पाच आरोपींना अटक केली. अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपासात एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, शैलेंद्र ठाकरे, सपोनि मुकुंद देशमुख, पोउपनि विकास चव्हाण आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



