मद्यधुंद टँकर चालकाने ११ वीच्या विद्यार्थिनीला चिरडले

धानोरा रोडवरील जांभळी परिसरातील घटना ; आईचा एकुलता एक आधार हिरावला
गडचिरोली : रस्त्याच्या कामावरील एका भरधाव आणि अनियंत्रित पाण्याच्या टँकरने सायकलने घरी परतणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीला चिरडल्याची भीषण घटना धानोरा रोडवरील जांभळी परिसरात घडली आहे. रिया श्रावण पदा असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. मद्यधुंद अवस्थेत टँकर चालवून एका निष्पाप मुलीचा जीव घेणाऱ्या चालकाविरुद्ध परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिया कारवाफा येथील राजीव गांधी हायस्कूलमध्ये ११ वीत शिकत होती. शाळा सुटल्यानंतर ती आपल्या मैत्रिणींसोबत सायकलने घराकडे निघाली होती. घर अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असताना, मागून येणाऱ्या रस्त्याच्या कामावरील टँकरने (क्र. एमएच 33-4095) तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, टँकरचे चाक रियाच्या डोक्यावरून गेले. विशेष म्हणजे, अपघातावेळी टँकरचालक रामेश्वर विलास चिमलवार (४०, रा. भामरागड) हा पूर्णपणे नशेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतप्त नागरिकांनी चालकाला जागीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
रियाचे आयुष्य सुरुवातीपासूनच संघर्षाचे होते. ती अवघ्या एक वर्षाची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर तिची आई वनिता ही आपल्या बहिणीकडे जांभळी येथे वास्तव्यास आली होती. गेल्या १५ वर्षांपासून काका उमेश करंगामी यांनी रियाला पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळून तिचे भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, एका बेजबाबदार चालकाच्या कृत्यामुळे वनिताबाईंचा म्हातारपणाचा एकमेव आधार कायमचा हिरावला गेला आहे.
शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रियाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. जांभळी येथे शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रियाच्या आईने केलेला हृदयद्रावक आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते. उमेश करंगामी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चालकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियमासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



