
भंडारा ग्रंथोत्सवाचा थाटात शुभारंभ : लेझीमचा ताल आणि ग्रंथदिंडीने वेधले शहरवासीयांचे लक्ष
भंडारा : “पुस्तके ही केवळ कागदाची पाने नसून ती ज्ञानाचा जिवंत वारसा आहेत. जिल्ह्यातील वाचन संस्कृती अधिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रशासन गांभीर्याने पावले उचलत असून, येणाऱ्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रंथालय निर्मिती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सावनकुमार यांनी केले.
महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘भंडारा ग्रंथोत्सव २०२५’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. स्थानिक जिल्हा परिषद जकातदार विद्यालयाच्या प्रांगणात हा दोन दिवसीय महोत्सव उत्साहात पार पडत आहे.
महोत्सवाच्या प्रारंभी सकाळी ९ वाजता जकातदार विद्यालयापासून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. लेझीमचा निनाद, बँड पथक आणि ‘ग्रंथ आमचे गुरु’ अशा घोषणांनी शहराचा परिसर दुमदुमून गेला होता. नूतन कन्या विद्यालय, महिला समाज शाळा व जकातदार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध लेझीम संचलनाने भंडारावासियांची मने जिंकली. ही दिंडी महात्मा गांधी चौकापर्यंत मार्गक्रमण करून पुन्हा ग्रंथप्रदर्शन स्थळी विसर्जित झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश वाकुडकर यांनी आपल्या भाषणात वर्तमान राजकीय आणि सामाजिक स्थितीवर निर्भीडपणे भाष्य केले. “साहित्याने केवळ मनोरंजन न करता समाजाला योग्य दिशा दिली पाहिजे,” असे सांगतानाच त्यांनी व्यवस्थेतील त्रुटींवर परखड ताशेरे ओढले. त्यांच्या वैचारिक मांडणीने उपस्थितांमध्ये मोठी चर्चा घडवून आणली.
या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ‘ज्ञानसागर’ या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र भोपचे यांनी प्रास्ताविकातून ग्रंथोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. जकातदार विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत आणि राज्यगीताचे सादरीकरण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी नगराध्यक्ष मधुरा मदनकर, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा दांदळे, जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरिगिट्टे, डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे, गजानन कोठेवार, संजय नारनवरे, घनश्याम कानतोडे यांसह अनेक मान्यवर, वाचक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नरेश आंबिलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन बाळासाहेब मुंडे यांनी मानले.
जकातदार विद्यालयाचे प्रांगण सध्या हजारो विविध विषयांच्या पुस्तकांनी सजले असून, पुस्तक खरेदीसाठी भंडाऱ्यातील चोखंदळ वाचकांनी मोठी गर्दी केली आहे. हा ग्रंथोत्सव खऱ्या अर्थाने ज्ञानाची पर्वणी ठरत आहे.



