गडचिरोलीविदर्भ

गडचिरोली जिल्ह्याला ‘गेटवे ऑफ साउथ इंडिया’ बनवणार – मुख्यमंत्री फडणवीस

गडचिरोली : केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेले भाजप सरकार गडचिरोली जिल्ह्याचा प्रचंड वेगाने विकास करत असून, या जिल्ह्याला ‘स्टील हब’ सोबतच ‘गेटवे ऑफ साउथ इंडिया’ बनवण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथील नगर परिषद निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, गडचिरोली शहराचा सर्वांगीण विकास हे राज्य सरकारचे प्राधान्य आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी आतापर्यंत ८०० कोटींपेक्षा अधिक निधीचा वापर करण्यात आला आहे. शहरासाठी आवश्यक असलेल्या १३० कोटींच्या नळयोजनेला तसेच ‘आऊटर रिंग रोड’ (बायपास) च्या कामाला लवकरच मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. जिल्ह्याला दक्षिण भारताशी जोडणारा नवा आर्थिक महामार्ग निर्माण करण्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे उद्योग, पर्यटन आणि व्यापार क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होतील. ‘लाडकी बहिण योजना’ कधीच बंद होणार नसून, “लखपती दीदी” योजनेतून लाडक्या बहिणींना अधिक अर्थसमृद्ध केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. वैद्यकीय महाविद्यालय सर्व सुविधांनी सुसज्ज होत असून जिल्ह्यात इतरही विकासकामे वेगाने पूर्ण होतील, असे त्यांनी नमूद केले.

या प्रचार सभेत चिमूरचे आमदार बंटी ऊर्फ किर्तीकुमार भांगडिया, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अ‍ॅड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर), रूपेश पुणेकर (आरमोरी) आणि लता सुंदरकर (देसाईगंज) यांचीही यावेळी उपस्थिती होती.

अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्या रोड-शोमुळे प्रचाराला बळ

नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराला अधिक बळ देण्यासाठी रविवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (पवित्र रिश्ता फेम) यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. भाजपच्या गडचिरोली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अ‍ॅड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या रोड शोला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रोड शोमध्ये भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. अभिनेत्रीच्या या रोड शोमुळे गडचिरोली नगर परिषदेसह इतरही परिषदांचा ‘गड’ सर करण्यासाठी भाजपच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button