
गडचिरोली : ‘तू नाही तर मीही नाही’ या भावनेतून एका प्रेमी युगुलाने टोकाचे पाऊल उचलले, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. मृत्यूशी झुंज देणारा प्रियकर सुखरूप परतला, मात्र तो वाचणार नाही या भीतीने गळफास घेतलेल्या प्रेयसीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गडचिरोली तालुक्यातील एका गावात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हळहळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील ३० वर्षीय तरुण आणि १९ वर्षीय तरुणी यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. सर्व काही सुरळीत सुरू असताना तीन वर्षांपूर्वी एका दुचाकी अपघाताने या तरुणाचे आयुष्य बदलून टाकले. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आणि तेव्हापासून तो अंथरुणाला खिळून होता. उपचारासाठी सर्व जमापूंजी खर्च झाली, तरीही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने तो प्रचंड नैराश्यात होता.
२८ जानेवारी रोजी याच वैफल्यातून तरुणाने टोकाचा निर्णय घेतला. त्याने व्हॉटॲपवर ‘निरोपाचे स्टेटस’ ठेवले आणि आपल्या प्रेयसीला फोन करून “मी उद्या नसेल” असे सांगत विष प्राशन केले. ही माहिती मिळताच त्याच्या मित्रांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे त्याचे प्राण वाचवण्यात यश आले.
दुसरीकडे, प्रियकराने विष घेतल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. आपला प्रियकर आता वाचणार नाही, या भीतीने १९ वर्षीय तरुणी व्याकूळ झाली. याच धक्क्यातून तिने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेतला. वेळीच तिच्या भावाने दरवाजा तोडून तिला फासावरून खाली उतरविले आणि जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
गेल्या सात दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या या तरुणीची प्राणज्योत अखेर ३ फेब्रुवारी रोजी मालवली. धक्कादायक वास्तव हे की, ज्या प्रियकरासाठी तिने हे पाऊल उचलले, तो आता धोक्याबाहेर आहे. मात्र, आपला प्रियकर सुरक्षित असल्याचे पाहण्यासाठी ती या जगात उरली नाही.
या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.



