गोंदियामुख्य बातमीविदर्भ

दूध भेसळ करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई ; पनीर, खवा आणि भेसळयुक्त दूध नष्ट

विनापरवाना विक्री करणाऱ्यांवरही होणार कायदेशीर कारवाई

गोंदिया : राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी शासनाने घेतलेल्या कडक भूमिकेनंतर आता गोंदिया जिल्हा प्रशासनही ॲक्शन मोडमध्ये आले आहे. जिल्हास्तरीय दूध भेसळ विरोधी समितीने गोंदिया शहरातील विविध भागांत अचानक धाडी टाकून संशयास्पद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्या दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जात आहेत.

अप्पर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांच्या नेतृत्वाखालील समितीने शहरातील तळ बाजार आणि सराफा लाईन परिसरातील सहा प्रमुख प्रतिष्ठानांची तपासणी केली. यामध्ये न्यु गोंदिया डेअरी (गंज बाजार/लोहा लाईन) येथे दूध विक्रीचा परवाना नसल्याचे आढळल्याने नियमानुसार कारवाई करण्यात आली. श्यामसुंदर डेअरी, लिल्हारे दुध डेअरी, वैशाली राजपुरोहित स्विट मार्ट आणि आनंद मिष्ठान भंडार: या केंद्रांवरून संशयास्पद नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

तपासणी दरम्यान भेसळीचा दाट संशय आल्याने अन्न व औषध प्रशासनाने ७,६८० रुपये किमतीचे २४ किलो पनीर जप्त करून नष्ट करण्यात आले. खराब चवीचा आणि आंबूस वास असलेला २१ किलो खवा नष्ट करण्यात आला. कुडवा, रेलटोली आणि गायत्री मंदिर परिसरात केलेल्या कारवाईत खराब चवीची मिठाई, कमी गुणप्रतीचे २८ लिटर दूध आणि रासायनिक वास येणारे १५ लिटर दूध समितीसमोरच ओतून देण्यात आले.

समितीने केवळ दुकानांवरच नव्हे, तर रस्त्यावरून दुधाची वाहतूक करणाऱ्या दूध उत्पादकांनाही थांबवून त्यांच्याकडील दुधाची जागेवरच तपासणी केली. कुडवा आणि पुनाटोली परिसरातील जय भोले, श्रीकृष्ण आणि किसान दूध डेअरीसह शुभम ट्रेडर्स व राजपुरोहित स्वीट्समध्येही तपासणी मोहीम राबवण्यात आली.

दूध भेसळीबाबत नागरिकांनी जागरूक राहावे, असे आवाहन करताना समितीचे अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांनी तक्रारीसाठी संपर्क पर्याय दिले आहेत: अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय: ०७१८२-२३६१४६, शासकीय दूध योजना कार्यालय: ९८९०१७१८२९, ई-मेल: bhesalvirodhisamiti@gmail.com

“ही मोहीम केवळ आजपुरती मर्यादित नसून यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांनी उच्च गुणप्रतीचे आणि भेसळमुक्त दुग्धजन्य पदार्थच विकावेत, अन्यथा कडक कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.”

— मिनाज मुल्ला, अध्यक्ष, दूध भेसळ विरोधी समिती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button