
गोंदिया : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिक आणि तरुण पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने गोंदिया येथील नवीन प्रशासकीय इमारतीत जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय ‘चित्रमय मल्टीमिडिया प्रदर्शनी’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः महाविद्यालयीन तरुणांसाठी ही प्रदर्शनी ज्ञानाची खाण ठरत असून, ‘स्वाधार’ योजनेच्या माहितीने विद्यार्थ्यांना आकर्षित केले आहे.
या प्रदर्शनीमध्ये शासनाच्या एकूण ४० महत्वपूर्ण योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने कृषी विभाग: प्रधानमंत्री पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, वैयक्तिक शेततळे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. उद्योग व इतर: प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. यांचा समावेश आहे.
प्रदर्शनीच्या दुसऱ्या दिवशी एन.एम.डी. कॉलेज आणि एस.एस. गर्ल्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भेट दिली. प्रदर्शनीमधील आकर्षक मांडणी आणि सोप्या भाषेतील माहितीमुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. “स्वाधार योजनेची माहिती आम्हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून, अशा उपक्रमांमुळे शासनाच्या योजनांचा लाभ घेणे सुलभ होईल,” अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी यावेळी दिली.
जिल्हा माहिती कार्यालयाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. ही चित्रमय प्रदर्शनी केवळ माहिती देणारी नसून अत्यंत विश्वसनीय आहे, असल्याचे मत जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर यांनी व्यक्त केले.
अनेकदा माहितीच्या अभावामुळे पात्र नागरिक योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. ही अडचण दूर करण्यासाठी प्रदर्शनीतील प्रत्येक पॅनलवर: योजनेचे स्वरूप, लाभाचे स्वरूप, लाभार्थी पात्रता, अर्जाची प्रक्रिया आणि संपर्क स्थळ यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक विक्की खिराळे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना ही प्रदर्शनी तरुण पिढीसाठी प्रेरणादायक असल्याचे म्हटले.
या प्रदर्शनीला जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक विक्की खिराळे यांनी भेट देऊन पाहणी केली. नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



