
अहेरी नगरपंचायतीची कारवाई वादाच्या भोवऱ्यात; माजी जि.प. अध्यक्षांचा उपोषण आणि जनआंदोलनाचा इशारा.
गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायत क्षेत्रात सध्या प्रशासकीय ‘दबंगगिरी’ आणि राजकीय सूडबुद्धीचा कळस गाठला जात असल्याचा खळबळजनक आरोप माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केला आहे. गडअहेरी मार्गावरील आपली चार मजली इमारत कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि कायदेशीर नोटीस न देता पोलीस बळाचा वापर करून पाडण्यात आल्याचा दावा त्यांनी अहेरी येथील पत्रकार परिषदेत केला.
कंकडालवार यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण खुलासा केला की, त्यांच्या इमारतीच्या संदर्भात ६ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपूर खंडपीठाने चार आठवड्यांची स्थगिती (Stay Order) दिली आहे. असे असतानाही, न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून नगरपंचायतीने ही कारवाई केल्याचे त्यांनी नमूद केले. “माझ्याकडे प्रॉपर्टी कार्ड, मोजणीचा नकाशा आणि क-शीट यांसारखी सर्व वैध कागदपत्रे असतानाही, तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रशासनाने केलेली ही कृती संशयास्पद आहे,” असे ते म्हणाले.
या प्रकरणावरून कंकडालवार यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गणेश शहाणे आणि त्यांचे सहकारी वैभव पांढरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “या अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली येऊन मला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी हे षडयंत्र रचले आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. कोणतीही नोटीस न देता, अचानक पोलीस बंदोबस्तात घर पाडणे ही केवळ प्रशासकीय दडपशाही असल्याचे त्यांनी सांगितले.
अजय कंकडालवार यांनी स्पष्ट केले की, त्यांनी नगररचना विभागाकडे यापूर्वीच अपील केले आहे. मात्र, या प्रक्रियेची वाट न पाहता प्रशासनाने बुलडोजर चालवल्याने आता त्यांनी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ शासनाकडे धाव घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जर मला या अन्यायाविरुद्ध न्याय मिळाला नाही, तर येत्या काळात मी केवळ न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार नाही, तर उपोषण आणि तीव्र जनआंदोलनाचा मार्ग पत्करेन, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
एका माजी वरिष्ठ लोकप्रतिनिधीच्या इमारतीवर अशा प्रकारे कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता यावर नगरपंचायत प्रशासन आपली काय बाजू मांडते आणि उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशावर काय स्पष्टीकरण देते, याकडे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



