गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीच्या शेतीमालाला आता थेट बाजारपेठ ; ‘कोया कृषी कुंभ’मध्ये १० मोठे व्यापारी करार संपन्न

गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि दुर्गम ही जुनी ओळख पुसून गडचिरोलीचा शेतकरी आता थेट जागतिक बाजारपेठेशी जोडला जात आहे. गडचिरोली येथे आयोजित ‘कोया कृषी कुंभ’ महोत्सवात पार पडलेल्या भव्य खरेदीदार-विक्रेता संमेलनाने जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात नवा इतिहास रचला असून, यादरम्यान शेतकरी उत्पादक कंपन्या आणि व्यापाऱ्यांमध्ये १० महत्त्वाचे थेट करार करण्यात आले आहेत.

शेतकरी आणि बाजारपेठ यांच्यातील मध्यस्थ (दलाल) दूर करून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा रास्त भाव मिळवून देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा नियोजन समिती, ‘आत्मा’, आणि प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना (PMFME) यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या उपक्रमात जिल्ह्यातील २० ते २२ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी (FPC) सहभाग नोंदवला.

संमेलनात प्रामुख्याने गडचिरोलीच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांवर भर देण्यात आला, ज्यात अन्नधान्य: तांदूळ, मका, विविध डाळी आणि कडधान्ये. वनोपज: मोहफूल आणि चारोळी. मसाले: हळद आणि इतर मसाले. या घटकांचा समावेश आहे.

यावेळी पुणे आणि वरोरा येथील मोठ्या कंपन्यांनी गडचिरोलीच्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. यामध्ये झेष्टीवाल लिमिटेड (पुणे), राईस मिलर गडचिरोली, कृषिकोन्नती आदिवासी शेतकरी उत्पादक कंपनी, आणि कांचणी फार्मर प्रोड्युसर कंपनी यांसारख्या संस्थांचा समावेश होता.

“खरेदीदारांना दर्जेदार माल उपलब्ध व्हावा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, हाच या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. गडचिरोलीचा शेतकरी आता प्रगत होत असून तो थेट राज्याच्या व्यापाऱ्यांशी व्यवहार करत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.” — अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी, गडचिरोली.

प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी स्पष्ट केले की, शेतकरी उत्पादक कंपनीच्या (FPC) माध्यमातून समूहाने व्यवहार केल्यामुळे शेतकऱ्यांची सौदाशक्ती (Bargaining Power) वाढली आहे. केवळ कच्चा माल न विकता त्याचे मूल्यवर्धन (Processing) आणि विपणन (Marketing) कसे करावे, याचे तंत्रही या संमेलनातून शेतकऱ्यांनी आत्मसात केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button