
नागेपल्ली : क्रीडा कौशल्याचा जबरदस्त आविष्कार आणि थरारक सामन्यांच्या जोरावर नागेपल्ली येथे आयोजित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लॉयड्स मेटल्स स्पोर्ट्स संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात जबलपूरच्या संघाला धूळ चारत लॉयड्सने चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
या स्पर्धेत केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर शेजारील राज्यांतील नामांकित संघांनीही सहभाग नोंदवला होता. यामध्ये लॉयड्स मेटल्स (यजमान), जबलपूर (मध्य प्रदेश), खम्मम व गडिकुटम (तेलंगणा), चंद्रपूर आणि अमादा पल्ली अशा सहा बलाढ्य संघांमध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यांमुळे प्रेक्षकांना दर्जेदार व्हॉलीबॉलचा आनंद घेता आला.
अत्यंत रोमांचक ठरलेल्या अंतिम सामन्यात लॉयड्स मेटल्स आणि जबलपूर या दोन संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. शेवटी, लॉयड्सच्या खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय साधत जबलपूरचा २-१ असा पराभव केला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल लॉयड्स मेटल्स संघाला ₹50,000 चे प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले. द्वितीय क्रमांक जबलपूर संघ तृतीय क्रमांक चंद्रपूर संघाने पटकावला.
या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण राजेशाही थाटात पार पडले. या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राणी रुख्मिणीदेवी आत्राम यांनी भूषवले, तर अवधेशरावबाबा आत्राम यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.
हा विजय म्हणजे केवळ एका स्पर्धेचा निकाल नसून, लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या संरचित प्रशिक्षणाचे यश असल्याचे मानले जात आहे. “तळागाळातील खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि शिस्त देऊन एक मजबूत क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी लॉयड्स कटिबद्ध आहे. हा विजय खेळाडूंच्या समर्पणाचे फळ आहे,” असे मत अकादमीच्या वतीने व्यक्त करण्यात आले.
नागेपल्लीतील या विजयाने लॉयड्स मेटल्सच्या खेळाडूंच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, स्थानिक क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.



