
पावसाळ्यात किटकजन्य आजार रोखण्यासाठी ‘अलर्ट‘ राहण्याचे आवाहन; डेंग्यू प्रतिरोध महिना साजरा
गोंदिया : पावसाळा सुरू होताच डेंग्यू, हिवताप, मेंदुज्वर, चिकनगुनिया यांसारख्या किटकजन्य आजारांचे रुग्ण वाढू लागतात. यंदा ही साथ वेळीच रोखण्यासाठी नागरिकांनी आतापासूनच ‘अलर्ट’ राहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. याचाच एक भाग म्हणून, देवरी तालुक्यातील अतिदुर्गम मकरधोकडा येथील रामकृष्ण आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना हिवताप आणि इतर किटकजन्य आजारांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ४० विद्यार्थ्यांची हिवताप आरडीके (RDK) किटने जलद रक्त तपासणीही करण्यात आली.
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जुलै महिन्यात (१ ते ३१ जुलै) डेंग्यू प्रतिरोध महिना साजरा केला जातो. या महिन्यादरम्यान, हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया आणि मेंदूज्वर यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी जनजागृती मोहिम आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जातात. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्येही आरोग्य विभागामार्फत विद्यार्थ्यांमध्ये किटकजन्य आजारांबाबत जनजागृती केली जात असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी दिली आहे.
१९ जुलै रोजी मकरधोकडा येथील रामकृष्ण आदिवासी आश्रमशाळेत एम्बेंड अशासकीय संस्था आणि आरोग्यवर्धिनी भरेगाव यांच्या एकत्रित सहकार्याने विद्यार्थ्यांची रक्त तपासणी आणि आरोग्य शिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. एम्बेंड संस्थेचे जिल्हा समन्वयक कांचन बिसेन यांनी याबाबत माहिती दिली.
यावेळी कांचन बिसेन यांनी ‘एडीस इजिप्ती’ या डासांपासून डेंग्यूची लागण होते आणि हा डास मानवी वस्तीजवळ अधिक आढळतो, असे स्पष्ट केले. भांडी, टायर, टब, फुलदाण्या, कुंड्या, पिंप, बादल्या, कुलर, नारळाच्या कवट्या, बाटल्या यासह अन्य ठिकाणी पाणी साचून राहिल्यास एडीस इजिप्ती या डासांची पैदास होते. पावसाळ्यात ही पैदास झपाट्याने होत असल्याने, परिसरात कुठेही पाणी साचू न देता वाहते करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील पाणी साठ्यावर झाकण ठेवावे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, मच्छरदाणीचा वापर करावा, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी, भंगार सामान व निकामी टायर यांची विल्हेवाट लावावी, कुलर, फ्रिजच्या ड्रीपपॅन मधील पाणी नियमितपणे स्वच्छ करावे.पाण्याचा हौद, टाक्या, रांजण इत्यादी दर आठवड्याला स्वच्छ करावे. नाल्या, गटारे वाहती करणे, साचलेल्या पाण्यात डबक्यात जळलेले ऑइल/रॉकेल सोडणे, कुंडी व फुलदाणी मधील पाणी बदलवित जाणे, घराच्या आजुबाजुला असलेले टायर्स, बाटल्या, बादल्या, करवंटे, या मधील पाणी फेकणे, डासाला पळवुन लावणार्या साधनांचा वापर करणे, झोपताना पुर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरावे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे. ज्या ठिकाणी पाणी साचून अळ्या होण्याची भीती आहे, अशा वस्तू काढून टाकाव्यात.घराच्या परिसरात भंगार वस्तू किंवा बांधकाम साहित्याचा साठा करू नये. पाण्याच्या टाकीमध्ये गप्पी मासे सोडावेत. अशा विविध उपाययोजना अंमलात आणुन किटकजन्य आजार लोकसहभागातुन कमी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.
या तपासणी व समुपदेशन कार्यक्रमात एम्बेंडचे कांचन बिसेन, भरेगाव उपकेंद्राचे आरोग्य सेवक पठाण, आशा सेविका गीता मार्कम, मुख्याध्यापक के.एस. इलमकर, अधीक्षक एम.एम. बारस्कर, शिक्षक एस.सी. चावरे, परिचर पी.व्ही. उईके यांनी सहभाग घेतला.



