
गोंदिया : महारेशीम अभियान-2026 अंतर्गत जिल्ह्यात तुती लागवड कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. 4 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 या कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कनवडे, जिल्हा समन्वयक BRLF नितेश बोपचे, तसेच चंद्रपाल आर. वासनिक (रेशीम विकास अधिकारी, अर्जुनी/मोरगाव), सतीश जी. राठोड (वरिष्ठ क्षेत्र व प्रयोगशाळा सहायक), ज्ञानेश्वर पी. भैरम (क्षेत्र सहायक), मुकेश व्ही. ऊके (प्रयोगशाळा परिचर) आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय जिल्ह्यातील प्रगतशील रेशीम शेतकरी प्रविण रामचंद्र खोटेले (खातिया), सुजित विजय फाये (कन्हारटोला), दीपक गोविंदराव मारवाडे (नागरा) आदींची उपस्थिती होती.
एकात्मीक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 अंतर्गत रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कृषी व वनसंपत्तीवर आधारित रेशीम उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीची क्षमता असून, राज्यातील हवामान रेशीम उत्पादनास अनुकूल असल्याने या उद्योगाला भरपूर वाव आहे.
कार्यक्रमात रेशीम विकास अधिकारी चंद्रपाल आर. वासनिक यांनी उपस्थितांना रेशीम शेती, तुती लागवड, कोष उत्पादन व शासनाच्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. पारंपरिक शेतीसोबत रेशीम शेती हा एक उत्तम पूरक व्यवसाय असून, इतर पिकांच्या तुलनेत अधिक नफा मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन केले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत प्रति एकर रुपये 4,32,240/- इतका लाभ तीन वर्षांसाठी तुती लागवड व कीटक संगोपन गृह बांधकामासाठी मजुरी व साहित्य स्वरूपात देण्यात येणार आहे. मनरेगासाठी अपात्र शेतकऱ्यांना केंद्रपुरस्कृत सिल्क समग्र–2 योजनेअंतर्गत अनुदान मिळणार आहे. तसेच कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा – टप्पा 2) योजनेअंतर्गत सर्वसाधारण गटासाठी प्रति एकर रुपये 3,25,125/- तर अनुसूचित जाती व जमातींसाठी प्रति एकर रुपये 3,90,150/- इतका लाभ देण्याची तरतूद आहे.
रेशीम शेतीबाबत संपूर्ण माहितीच्या अभावामुळे शेतकऱ्यांचा सहभाग अपेक्षित प्रमाणात दिसून येत नसल्याने, महिलांचा सहभाग वाढवणे, पर्यावरण संतुलन राखणे व आधुनिक रेशीम तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे या उद्देशाने महारेशीम अभियान–2026 अंतर्गत गावोगावी जनजागृती व प्रचार-प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
या अभियानाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी तुती लागवडीसाठी नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रेशीम विकास अधिकारी (श्रेणी-2), जिल्हा रेशीम कार्यालय, अर्जुनी/मोर, बी.एस.एन.एल. कार्यालयामागे, साकोली रोड, जि.गोंदिया किंवा दुरध्वनी नंबर 07196-220728 / 9552715827 सी. आर. वासनिक, 7820994711 एस. जी. राठोड, 9370051535 डी. पी. भैरम यांच्याशी संपर्क करावा.



