महाराष्ट्रमुंबई

विद्यापीठ प्राध्यापक भरती आता अधिक पारदर्शक; गुणदानाची यादी संकेतस्थळावर जाहीर होणार – मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील अध्यापक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. आता उमेदवारांना मिळालेल्या गुणदानाची यादी त्यांच्या गुणांसह विद्यापीठांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. यासोबतच तासिका तत्त्वावरील (CHB) प्राध्यापकांना अनुभवाचे गुण आणि मानव्यविज्ञान शाखेसाठी जाचक अटी शिथिल करून नव्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

नव्या निर्णयानुसार, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तासिका तत्त्वावर (CHB), कंत्राटी किंवा ॲडहॉक तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांचा अनुभव आता कायमस्वरूपी भरतीसाठी ग्राह्य धरला जाणार आहे. वर्षानुवर्षे अल्प मानधनावर काम करणाऱ्या प्राध्यापकांसाठी हा निर्णय अत्यंत कळीचा ठरणार असून, त्यांच्या अनुभवाला पात्रतेसाठी विशेष महत्त्व दिले जाणार आहे.

मानव्यविज्ञान (Humanities) शाखेतील प्राध्यापकांसाठी ‘स्कोपस’ किंवा ‘वेब ऑफ सायन्स’ मधील प्रकाशनाची अट काही अंशी शिथिल करण्यात आली आहे. आता या शाखेतील शिक्षकांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे गुणही ग्राह्य धरले जातील. यामुळे या क्षेत्रातील संशोधकांना समान संधी उपलब्ध होणार आहे.

निवड प्रक्रियेतील महत्त्वाचे बदल: पारदर्शकता: मुलाखतीचे गुण आणि एकूण गुणदान विद्यापीठाच्या वेबसाईटवर सार्वजनिक केले जाईल. गुणदानात सुधारणा: एनआयआरएफ (NIRF), क्युएस (QS) आणि ‘टाईम्स हायर एज्युकेशन’ रँकिंगनुसार गुणदान पद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे, ज्याचा फायदा ग्रामीण भागातील गुणवंत उमेदवारांना होईल. कौशल्यांवर भर: मुलाखतीदरम्यान अध्यापकांचे आयसीटी (ICT) कौशल्य, प्रगत तांत्रिक ज्ञान आणि सह-शालेय उपक्रम (Co-curricular activities) यांना विशेष महत्त्व दिले जाईल. संशोधनाला प्राधान्य: विविध संशोधन प्रकल्प आणि शिखर संस्थांकडून मिळालेला निधी या निकषांवरही भर देण्यात आला आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत (NEP) अपेक्षित असलेली अध्ययन-अध्यापन पद्धती राबवण्यासाठी सक्षम शिक्षकांची निवड व्हावी, या उद्देशाने ही कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. “उत्कृष्टतेला प्राधान्य देतानाच सर्व घटकांना समान संधी मिळेल, असा हा शासन निर्णय आहे,” असे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी नमूद केले. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button