
‘सावरकरांचे विचार हेच राष्ट्राला दिशा देणारे’ – माजी आ. गजबे ; ‘राष्ट्रप्रथम’ हीच भावना मनात ठेवून देश विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प
कुरखेडा : “प्रखर राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे केवळ एक नाव नसून ती अथांग देशभक्ती, अजोड त्याग आणि अदम्य साहसाची जिवंत प्रेरणा आहे. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये इंग्रजांचे अमानुष अत्याचार सहन करूनही त्यांचा देशाभिमान तिळमात्र कमी झाला नाही. सावरकरांचे जाज्वल्य विचार आजही राष्ट्राला योग्य दिशा देणारे आहेत,” असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कृष्णाजी गजबे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी कुरखेडा तालुक्याच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवारी (२८ मे) एका विशेष अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार कृष्णाजी गजबे यांच्या कुरखेडा येथील जनसंपर्क कार्यालयात हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार कृष्णाजी गजबे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कृष्णा गजबे यांनी सावरकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. सावरकर हे केवळ क्रांतिकारक नसून एक महान विचारवंत, थोर कवी आणि द्रष्टे समाजसुधारक होते, असे ते म्हणाले. “आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी ‘राष्ट्रप्रथम’ हीच भावना मनात ठेवून समाज आणि देशाच्या विकासासाठी स्वतःला कटिबद्ध केले पाहिजे, हीच त्यांना खरी आणि सार्थ आदरांजली ठरेल,” असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा सचिव गणपत सोनकुसरे, भाजपचे ज्येष्ठ नेते विलास गावंडे, भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बबलूभाई हुसैनी, तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, शहराध्यक्ष सागर निरंकारी, नगरसेवक विलास गोटेफोडे, अॅड. उमेश वालदे, माजी तालुकाध्यक्ष नाजूकराव पुराम, भाजप जिल्हा सचिव रूपाली कावळे, शितल लांजेवार, रंजना मेश्राम, कृष्णा चंद्रमा, राजेश उईके, ओमप्रकाश मेश्राम, उल्हास देशमुख, महादेव पुंगळे आणि राकेश खुणे यांच्यासह भाजपचे सर्व तालुका पदाधिकारी, विविध शक्ती केंद्रांचे प्रमुख, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



