
६५ वर्षीय वृद्धेसह धानोरावरून संदर्भित तरुणीच्या पोटातून दुर्मिळ कॅन्सरयुक्त गाठ काढण्यात डॉक्टरांना यश
गडचिरोली : जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने आपल्या उच्च दर्जाच्या वैद्यकीय कौशल्याचे दर्शन घडवत एकापाठोपाठ एक, अशा दोन अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक अंडाशयाच्या गाठींच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. राज्याचे माननीय आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा रुग्णालयात कॅन्सर (Malignancy) आणि इतर गंभीर आजारांच्या शस्त्रक्रिया स्थानिक पातळीवरच उपलब्ध करून देण्याच्या विशेष सूचना दिल्या होत्या. त्यांच्या या संकल्पनेला आता मोठे यश आले असून, गडचिरोलीच्या डॉक्टरांनी अतिदुर्गम व ग्रामीण भागातील रुग्णांना थेट नवजीवन दिले आहे.
या यशस्वी मोहिमेमुळे गरीब रुग्णांना आता नागपूर किंवा इतर मोठ्या शहरात धाव न घेता गडचिरोलीतच उच्च दर्जाचे उपचार पूर्णपणे मोफत व खात्रीशीर मिळत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या पोटात अंडाशयाची मोठी गाठ असल्याचे निदान झाले होते. रुग्णाचे प्रगत वय आणि गाठीची गुंतागुंत पाहता ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक मानली जात होती. मात्र, स्त्रीरोग तज्ज्ञ तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या खंबीर आणि कुशल मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षितपणे पूर्ण करण्यात आली.
या शस्त्रक्रियेत त्यांना डॉ. आकाश, डॉ. शरद आणि डॉ. मानसी यांनी मोलाचे सहकार्य केले. शस्त्रक्रियेदरम्यान अत्यंत महत्त्वाची असणारी भूल देण्याची जबाबदारी भूलतज्ज्ञ डॉ. मित्तल आणि डॉ. सुकेशनी यांनी चोख बजावली. ऑपरेशन थिएटर इन्चार्ज माधुरी गेडाम व किरण सिस्टर यांनीही यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. शस्त्रक्रियेनंतर या वृद्ध रुग्णाची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून त्यांची प्रकृती वेगाने सुधारत आहे.
धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयातून संदर्भित झालेल्या एका २६ वर्षीय तरुण महिला रुग्णावर जिल्हा रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी दुसरी अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया केली. या तरुणीच्या पोटात असह्य वेदना होत होत्या आणि पोटाला साधारण २४ आठवड्यांच्या गर्भावस्थे एवढी मोठी गाठ जाणवत होती. सीटी स्कॅन आणि सोनोग्राफी चाचणीत तिच्या उजव्या अंडाशयामध्ये घन आणि द्रवरूप मिश्रित मोठी गाठ असल्याचे समोर आले होते. सुरुवातीला ‘ट्युबो-ओव्हेरियन ॲब्सेस’ असण्याची शंका देखील डॉक्टरांनी व्यक्त केली होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्य शल्यचिकित्सक डॉ. मयुर दुधे, प्रथम सहाय्यक डॉ. कृणाल चेंदकापुरे, द्वितीय सहाय्यक सुमेध कांबळे, तृतीय सहाय्यक प्रियांका मडावी आणि भूलतज्ज्ञ डॉ. अंकिता भावते यांच्या पथकाने तात्काळ निर्णय घेत ‘एक्स्प्लोरेटरी लॅप्रोटोमी’ करून तिचे उजवे अंडाशय आणि ती मोठी गाठ शरीरातून यशस्वीरीत्या बाहेर काढली.
शस्त्रक्रियेनंतर या गाठीचा तपासणी अहवाल आला असता, त्यामध्ये हा एक अत्यंत दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर ‘मिक्स्ड जर्म सेल ट्युमर’ असल्याचे निष्पन्न झाले. या गाठीमध्ये ९०% वाटा ‘योल्क सॅक ट्युमर’ आणि १०% वाटा ‘एम्ब्रायोनल सेल कार्सिनोमा’ चा होता. डॉक्टरांच्या प्रसंगावधानतेमुळे आणि तत्परतेमुळे या कॅन्सरयुक्त गाठीला शरीरातून वेळेतच पूर्णपणे बाहेर काढण्यात यश आले असून तरुणीचे प्राण वाचले आहेत.
खासगी रुग्णालयांमध्ये लाखो रुपयांचा खर्च येणाऱ्या कॅन्सर आणि ट्युमरच्या अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली अगदी मोफत आणि यशस्वीपणे पार पाडल्या जात आहेत. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी, गरीब आणि सामान्य रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. या दोन्ही रुग्णांच्या यशस्वी उपचारामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे व त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.



