आरोग्यगडचिरोलीविदर्भ

अतिदुर्गम बिनागुंडात आरोग्य शिबीर ; २५० हून अधिक नागरिक व विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी

ऑपरेशन रोशनी आणि आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून ४० हजारांहून अधिक नागरिकांना मिळाले जीवदान

गडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील नागरिकांपर्यंत आधुनिक आरोग्य सेवा पोहचवण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर असते. याच सामाजिक बांधिलकीतून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली १५ फेब्रुवारी रोजी नवनिर्मित पोलीस मदत केंद्र (पोमके) बिनागुंडा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात बिनागुंडा आणि परिसरातील २५० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.

या शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सेवा पुरवण्यात आली. प्रामुख्याने डॉ. वर्षा लहाडे (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. माधुरी किलनाके (सर्जन), डॉ. प्रशांत पेंदाम (बालरोग तज्ञ) आणि पोलीस रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मडावी व डॉ. गणेश चिचघरे यांच्या चमूने रुग्णांची सखोल तपासणी केली.

शिबिरात बालरोग तज्ञांनी शालेय विद्यार्थ्यांची, तर स्त्रीरोग तज्ञांनी गरोदर मातांची तपासणी करून त्यांना पोषणाबाबत मार्गदर्शन केले. तपासणीनंतर गरजू रुग्णांना जागेवरच औषधे उपलब्ध करून देण्यात आली. गंभीर आजार आढळलेल्या १४ रुग्णांना पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये शिफारस (Refer) करण्यात आले आहे.

पोलीस दलाने केवळ कायदा आणि सुव्यवस्थाच नव्हे, तर आरोग्य क्षेत्रातही विक्रमी कामगिरी केली आहे. २०२१ पासून आजपावेतो एकूण १७८ आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून एकूण ४०,०१५ नागरिकांची आरोग्य तपासणी केलेली आहे. तसेच एकूण ०५ रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून एकूण ४,३६१ युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे. यासोबतच ऑपरेशन रोशनीच्या माध्यमातून एकूण ९,९७१ पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करुन एकूण १,४१२ नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा, गोकुल राज जी. आणि सीआरपीएफचे कमांडंट शंभू कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोमके बिनागुंडाचे प्रभारी अधिकारी सपोनि रोहन पाटील व त्यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले. नवनिर्मित पोमके बिनागुंडाचे प्रभारी अधिकारी सपोनि. रोहन पाटील यांच्या नेतृत्वात पोउपनि रोहन शिरसाट, सागर मोरे, शुभम भगत व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button